काँग्रेसची सूत्र कुणाकडे जाणार? अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोंबरला मतदान
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
28 Aug :- काँग्रेस कार्यकारिणीची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाध्यक्ष निवडीसंदर्भातील कार्यक्रमाला मंजुरी दिली आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी नामांकन प्रक्रिया 24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत असेल. 17 ऑक्टोबरला निवडणुका होणार आहेत आणि निवडणुकीची मतमोजणी आणि निकाल 19 ऑक्टोबरला जाहीर होतील, अशी माहिती काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल यांनी दिली. गुलाम नबी आझाद यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर ही बैठक अत्यंत महत्त्वाची होती.
काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) आभासी बैठक आज दुपारी 3:30 सुरू झाली होती. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या. या बैठकीपूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले होते की, काँग्रेस पक्षाला ‘कठपुतली अध्यक्ष’ नसून रीतसर निवडून आलेल्या अध्यक्षाची गरज आहे.
CWC ची बैठक अशा वेळी होत आहे, जेव्हा सोनिया वैद्यकीय तपासणीसाठी परदेशात आहेत. त्यांच्यासोबत राहुल गांधी आणि प्रियांका गांधीही आहेत. सीडब्ल्यूसीच्या ऑनलाइन बैठकीत हे तीन प्रमुख नेते सहभागी झाले होते. सध्या काँग्रेस ‘भारत जोडो यात्रा’ ची तयारी करत आहे. ही यात्रा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत काढण्यात येणार आहे. ही पदयात्रा 12 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधून जाणार आहे.