महाराष्ट्र

ठाकरेंची पुन्हा पक्षबांधणी! जाधव, सावंतांना बढती…

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव यांची शिवसेना नेतेपदी आणि पराग लीलाधर डाके यांची शिवसेना सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडल्यानंतर पक्षातील अनेक महत्त्वाची पदे रिक्त झाली आहेत. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून पुन्हा नव्याने पक्षबांधणी करण्यात येत आहे. उद्धव ठाकरेंकडून राज्यभरात नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी तीन महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्या नुकत्याच जाहीर केल्या.

बंडानंतर उद्धव ठाकरेंसोबत कायम असलेले आणि शिंदे गटावर टीकेची झोड उठवणारे अरविंद सावंत आणि भास्कर जाधव यांची पक्षामध्ये आता बढती देण्यात आली आहे. त्यांची शिवसेना नेतेपदी उद्धव ठाकरेंनी नियुक्ती केली आहे. तर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके यांच्या मुलावरही उद्धव ठाकरे यांनी सचिवपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे अरविंद सावंत आणि भास्कर जाधव येत्या काळात शिंदे गटाविरोधात आणखी आक्रमक होणार असल्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके आणि मनोहर जोशी यांची भेट घेतली होती. या नेत्यांना आपल्या बाजुला वळवून आपलाच गट खरी शिवसेना असल्याचे शिंदेंकडून दाखवले जात आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे आता निष्ठावंतांची विशेष काळजी घेत असल्याचे दिसत आहे. याच कारणामुळे पराग लीलाधर डाके यांची शिवसेनेच्या सचिवपदी वर्णी लागल्याची चर्चा आहे.

तर, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून सातत्याने शिंदे गटाविरोधात आक्रमक वक्तव्ये करणारे व विधानसभेतही आक्रमकपणे शिवसेनेची बाजू लावून धरणाऱ्या भास्कर जाधव आणि संसदेत शिवसेनेचा किल्ला लढवणाऱ्या अरविंद सावंत यांना नेतेपद देऊन दोघांचेही प्रमोशन करण्यात आले आहे. त्यामुळे हे दोन नेते शिंदे गटाविरोधात आणखी आक्रम होणार, हे स्पष्ट आहे.