करुणा मुंडेंना 30 लाखांचा गंडा! तिघांनी केली फसवणूक
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
27 Aug :- बांधकाम कंपनीत नफ्याचे आमिष दाखवून तिघांनी 30 लाखांची फसवणूक केली, अशी तक्रार करुणा मुंडे यांनी केली आहे. या प्रकरणी संगमनेर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक करणारे तिघे हे धनंजय मुंडेंच्या संपर्कातील असल्याने त्यांच्या बांधकाम कंपनीत गुंतवणूक केली होती, अशी माहिती करुणा यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली. करुणा मुंडे यांनी नवीन पक्ष काढण्याची घोषणा केली होती. यावेळी त्यांनी राज्याचा दौरा केला.
यावेळी नवा पक्ष सुरू करण्यासाठी लागणारा पैसा मिळवण्यासाठी आमच्या बांधकाम कंपनीत गुंतवणूक करा, त्यातून तुम्हाला चांगला नफा मिळेल. तुम्हाला कंपनीत संचालक करतो आणि आम्ही तुमच्या पक्षाचे काम करतो असे सांगत धनंजय मुंडेंच्या संपर्कातील आरोपी भारत संभाजी भोसले (रा. निमगाव जाळी, ता. संगमनेर), विद्या संतोष अभंग व प्रथमेश संतोष आभंग (दोघे रा.घुलेवाडी, ता. संगमनेर) या तिघांनी आपली फसवणूक केली अशी तक्रार करुणा मुंडे यांनी संगमनेर पोलिसांत केली होती. यानंतर तिघांविरुद्ध फसवणूक केल्याचा आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करुणा मुंडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी भारत भोसले कामानिमित्त धनंजय मुंडे यांच्याकडे वारंवार येत होते. त्यावेळी त्याचा परिचय झाला होता. जानेवारी 2022 मध्ये आरोपी भारत, विद्या आभंग व प्रथमेश अभंग मुंबईला मुंडे यांच्या घरी आले होते. यावेळी भोसले म्हणाले आम्हाला पक्षात घ्या विभागून खर्च करू, त्यामुळे पक्ष स्थापणेसाठी बोलणी सुरू केली असे करुणा मुंडेंनी फिर्यादीत म्हटले आहे.
लेवलसेट कन्स्ट्रक्शन प्रा. लि. ही कंपनी असल्याचे सांगून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव मुंडे यांना भोसलेंनी दिला. त्यात 30 लाख गुुंतवले तर महिन्याला 45 ते 70 हजार देऊ असे भोसलेंनी सांगितल्याने त्यात काही पैसे चेकने तर काही रोखीने दिल्याचे करुणा मुंडेंनी सांगितले आहे. मात्र, पैसे दिल्यानंतर परतावा तर नाहीच पण संपर्कातही होणारी टाळाटाळ होत असल्याचे लक्षात येताच आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. मात्र, पैसे मागितल्यास खोट्या गुन्हात अडकवण्याची धमकी या तिघांकडून देण्यात आल्याचे करुणा मुंडे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे्.