महाराष्ट्र

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अभूतपूर्व गोंधळ

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

24 Aug :- आज पावसाळी अधिवेशनाला पाचवा दिवस असून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अभूतपूर्व असा गोंधळ घडला. यावेळी सत्ताधारी-विरोधका आमने-सामने आणि राडा झाला. कोविडच्या भीतीने राजा बसला घरी, वाझेचे खोके- मातोश्री ओके, लवासाचे खोके-बारामती ओके, अशा घोषणा सत्ताधारी पक्षाने दिल्या. तर ‘50 खोके एकदम ओके अन् खावून खावून माजलेत बोके!’ ‘गाजर देणे बंद करा, ओला दुष्काळ जाहीर करा’, अशा गगनभेदी घोषणा देत विरोधकांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.

माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, शिंदे गटाच्या आमदारांना आमच्या घोषणा झोंबल्या. यामुळेच त्यांच्यातील काही आमदार आज विधिमंडळातील पायऱ्यांवर आलेत. त्यांच्या या वागण्याने हे निष्पन्न झाले आहे की, त्यांच्या विरोधात दिलेल्या घोषणा त्यांच्या मनाला लागल्या आहेत. आतापर्यंत सत्ताधारीपक्षाने कधीच पायऱ्यांवर आंदोलन केले नाही. आम्ही सत्तेत असतानाही विरोधकांनी पायऱ्यांवर येऊन घोषणाबाजी केली. आम्ही त्यांना कधीच अडवले नाही. चोराच्या मनात चांदणे, असा प्रकार आज हा घडला आहे.

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधी आमदार एकमेकांच्या अंगावर धावले व त्यांच्यात धक्काबुक्कीही झाल्याचे दिसून आले. शिंदे गटातील महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी भिडल्याचे पाहायला मिळाले. यानंतर अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे.

विधान भवनाच्या पायऱ्यांवर राडा झाल्यानंतर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, विरोधकांनी आमच्यावर आरोप केले. म्हणून त्यांना उत्तर देण्यासाठी आम्ही आंदोलन केले. आम्ही कुणाला पाय लावत नाही. आम्हाला कुणी पाय लावत असेल तर आम्ही सोडणार नाही. कुणी अंगावर आले तर आम्ही शिंगावर घेऊ, असे ते म्हणाले. आम्ही कुणाच्या आत जात नाहीत, आमच्या आत कुणी येऊ नये, असा इशाराच त्यांनी दिला.