भारत

काँग्रेसला मोठा झटका; राष्ट्रीय प्रवक्त्यांनीच दिला राजीनामा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

24 Aug :- गेल्या वर्षभरात काँग्रेस पक्षाला काही तरुण पण प्रभावी नेतेमंडळींनी रामराम ठोकल्यामुळे पक्षाला मोठे धक्के पचवावे लागले आहेत. यामध्ये ज्योतिरादित्य सिंदियांपासन जितीन प्रसाद यांच्यापर्यंत नेत्यांचा समावेश होता. आता काँग्रेसला अजून एक मोठा धक्का बसला असून पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनीच राजीनामा दिला आहे.

विशेष म्हणजे राजीनामा देताना त्यांनी पक्षात लाळघोटेपणा वाढत असल्याची टीका केली आहे. तसेच, समाजहितासाठी पक्षात निर्णय होत नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेसमधील तरुण फळीतील नेतेमंडळी पक्ष सोडत असल्याचं चित्र यातून निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते जयवीर शेरगिल यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून राजीनामा सादर केला आहे. या पत्रामध्ये शेरगिल यांनी पक्षातील बदललेल्या वातावरणाविषयी सडेतोड भूमिका मांडली आहे.

जयवीर शेरगिल यांनी राजीनामा पत्रामध्ये पक्षात लोकहितासाठी निर्णय घेतले जात नसल्याचं म्हटलं आहे. “मला हे सांगताना वाईट वाटत आहे की पक्षात आता लोकांच्या आणि देशाच्या हितासाठीचे निर्णय घेतले जात नाहीत. त्याऐवजी निर्णय प्रक्रियेवर काही विशिष्ट लोकांच्या स्वार्थी हेतूचा प्रभाव असल्याचं दिसून येतं. हे लोक लाळघोटेपणा करत असून प्रत्यक्ष वास्तवाकडे दुर्लक्ष करणारे आहेत”, असं शेरगिल यांनी पत्रात म्हटलं आहे.

शेरगिल यांना गेल्या काही महिन्यांपासून पत्रकार परिषद घेण्यापासून रोखण्यात आल्याचं सांगितलं जातं. राजीनामा देताना ते पुढे म्हणाले, “काँग्रेस पक्षाची विचारसरणी आणि पक्षातील सध्याच्या निर्णय प्रक्रियेतील नेतेमंडळी हे आधुनिक भारताच्या दृष्टीने अपुरे पडत आहेत”, असं देखील ते म्हणाले.

दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना जयवीर शेरगिल यांनी सांगितलं, “काँग्रेसमध्ये दोन प्रकारचे लोक आहेत. एक ते, ज्यांच्यासाठी काँग्रेस हे त्यांचं घर आहे. आणि दुसरे ते, ज्यांचं घर काँग्रेसमुळे चालतं”. याशिवाय, “मी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना भेटण्यासाठी जवळपास वर्षभरापासून वेळ मागत असून देखील मला वेळ दिली गेली नाही”, असं देखील ते म्हणाले.