महाराष्ट्र

विधान भवनासमोर आत्मदहनाचा प्रयत्न; रॉकेल ओतून घेतले पेटवून…

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

23 Aug :- राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आत अधिवेशन सुरू असताना विधान भवनाच्या बाहेर एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. गावातील शेतीच्या वादातून स्वत:ला पेटवून घेणाऱ्या शेतकऱ्याचे नाव सुभाष भानुदास देशमुख असे त्यांचे नाव असून उस्मानाबादमधील धाराशिवचे रहिवासी आहेत.

विधिमंडळ परिसरात सुभाष देशमुख यांनी विधान भवनाबाहेर रॉकेल अंगावर टाकत स्वत:ला पेटवून घेतले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आग विझवत देशमुख यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. शेतीच्या वादातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे.

याप्रकरणावरुन विधानभवनात मोठा वाद झाला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना थेट धारेवर धरले. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही या प्रकरणाची माहिती घेतली असून संबंधित शेतकऱ्याला रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले. सुभाष देशमुख यांना सर्व मदत केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

शेतकऱ्याच्या आत्मदहनाच्या प्रयत्नावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आम्ही सरकारला आपत्ती जाहीर करण्याची विनंती केली होती. मात्र, सरकारने फार कमी मदत केली. त्यांनी 50 हजार हेक्टरची मदत द्यावी, ही आमची मागणी आहे. एकीकडे सरकार याबाबत उत्तरे देत आहे. तर दुसरीकडे विधानसभेबाहेर शेतकरी आत्महत्येचा प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, म्हणून आम्ही सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकल्याचे ते म्हणाले.