महाराष्ट्र

ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! म्हणाले, …गद्दारांची हिमंत नाही

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

21 Aug :- राज्यातील सत्तासंघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होत आहे. यावर न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तसेच, निवडणुकीला सामोरे जाण्याची गद्दारांची हिमंत नाही. त्यामुळेच राज्यात लवकर निवडणुका होतील, असे वाटत नसल्याचा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.

उद्धव ठाकरे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात उद्या महत्त्वपूर्ण सुनावणी आहे. न्यायालयात जे व्हायचे ते होईल. माझा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे. तेवढाच विश्वास मला जनतेवरतही आहे. गद्दारांची भूमिका जनतेला अजिबात आवडलेली नाही. त्यामुळे निवडणुकीत जनतेला केव्हा धडा शिकवू, याची वाट जनता पाहत आहे. त्यामुळेच गद्दारांना लवकर निवडणूक घेण्याची हिंमत होत नाहीये.

राज्यात वेळेआधी निवडणुका होणार नाहीत. उद्धव ठाकरे म्हणाले, बंडखोरांकडे सर्वच पैशांनी होते. त्यांच्याकडे पैशांचीच किंमत आहे. मात्र, माझ्याकडे रक्तामासांची माणसे आहेत. शिवसैनिक माझ्यासोबत असेपर्यंत मला कोणतीही चिंता नाही. निवडणुकीत सर्व चित्र स्पष्ट होईल.

विधानपरिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या ‘मातोश्री’ या पुस्तकाचे आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी विधान परिषदेमध्ये बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांना खडे बोल सुनावल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी नीलम गोऱ्हेंचे कौतुक केले. उद्धव ठाकरे म्हणाले, विधानपरिषद सभागृहाकडे अवघ्या राज्याचे लक्ष आहे.

लोक या सभागृहाकडे अपेक्षेने पाहत असतात. त्यामुळे सभागृहाचे पावित्र्य ऱाखलेच पाहिजे. नीलमताईंनी एका नेत्याला मंत्री तुम्ही तुमच्या घरी असाल, असे जे सुनावले ते योग्यच होते. उद्या मुख्यमंत्र्यांनीही या संकेतांचा भंग केल्यास नीलमताईंनी त्यांनाही अशाच पद्धतीने कार्यपद्धतीची आठवण करुन द्यायला हवी, अशी अपेक्षाही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेनेचे आ. अनिल परब प्रश्न विचारत असताना गुलाबराव पाटील यांनी खाली बसून शिवसेनेच्या आमदारांना आव्हान दिले होते. तेव्हा ‘कुठल्या चौकात उभे आहात का? मंत्री असाल तर तुमच्या घरी, हे सभागृह आहे, छातीवर हात बडवून काय बोलता, ताबडतोब खाली बसा,’ अशा शब्दांत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटील यांना खडसावले होते.