महाराष्ट्र

फडणवीसांना पुण्यातून लोकसभेचे तिकीट द्या; ब्राह्मण महासंघाची मागणी

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

19 Aug :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने केली आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्र लिहिले असून, त्यात हे साकडे घातले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय संसदीय समिती व निवडणूक समितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच निवड जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर ही मागणी करण्यात आली आहे. याबाबत अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष गाेविंद कुलकर्णी म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे हुशार राजकीय व्यक्तिमत्व असून त्यांनी यापूर्वी सलग पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवले आहे. राज्यातील जनतेचे कल्याण व्हावे याकरीता त्यांनी अथक प्रयत्न केले असून भाजपचे ते भविष्य आहेत.

गोविंद कुलकर्णी म्हणाले की, भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यानंतर सक्षम नेतृत्व प्रदान करण्यात जी दाेन ते तीन नावे समाेर येतात त्यात देवेंद्र फडणवीस यांचे नाव अग्रस्थानी आहे. एक महिन्यापूर्वी ज्याप्रकारे त्यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद घेण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी तयार केले. त्यामुळे त्यांच्या करिष्माला काही प्रमाणात धक्का लागला आहे. परंतु केंद्रीय संसदीय समितीत त्यांची निवड करुन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामुळे राष्ट्रीय स्तरावर फडणवीस यांचे काम सुरू हाेत आहे. प्रसारमाध्यमातून भाजपचे वरिष्ठ नेते फडणवीस यांच्याकरिता आगामी लाेकसभा निवडणुकीत सुरक्षित मतदारसंघ शाेधत असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे.

गोविंद कुलकर्णी पुढे म्हणाले की, पुणे हा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा गड असून 2006 मध्ये आम्ही काँग्रेसचे सुरेश कलमाडी, 2014 मध्ये भाजपचे अनिल शिराेळे, 2019 मध्ये गिरीष बापट यांच्यासाेबत उभे राहिलाे. त्याचा परिणाम समाेर आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी पुणे हा सुरक्षित मतदारसंघ आहे. फडणवीस यांनी या मतदारसंघातून नामांकन भरले, तर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ त्यांना विजयी करण्यासाठी काम करेल.

गोविंद कुलकर्णी म्हणाले की, भाजपमध्ये अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र माेदी यांचे नेतृत्वाची महान परंपरा असून ती देवेंद्र फडणवीस पुढे टिकवतील हा विश्वास आम्हाला आहे. अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ काेणत्याही राजकीय पक्षाशी जाेडलेला नाही. परंतु राष्ट्र हिताच्या दृष्टीने आमचा हा आग्रह आहे.