महाराष्ट्र

कृषीमंत्री सत्तार मुख्यमंत्री शिंदेंवर नाराज?; तर्कवितर्कांना उधाण…

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

19 Aug :- शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार हे नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेसचे माजी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता जरी सत्तारांनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले असले तरी यामुळे वेगळीच राजकीय चर्चा सुरू झालीय.

शिवसेनेत राज्यमंत्री असलेले अब्दुल सत्तार यांना शिंदेसोबत बंड केले होते. यानंतर त्यांची कॅबिनेट मंत्रिपदी निवड करण्यात आली. त्यांना कृषी खाते देण्यात आले असले, तरी ते अल्पसंख्याक मंत्री पदासाठी इच्छुक असल्याचे दिसून आले होते. यामुळे आज त्यांनी काँग्रेसच्या माजी मंत्र्यांची भेट घेत 20 मिनिटे चर्चा केल्याने या भेटीकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

मंत्रिमंडळाच्या विस्तरानंतर शिंदे गटात अस्वस्थता आहे. त्यातच सकाळी साडे आठ वाजता त्यांनी राऊतांच्या घरी भेट देत बैठकीसाठी आयुक्तालयात गेल्याने राज्याच्या राजकारणात नवी नांदी देणार का असा सवाल उपस्थित होत आहे.अब्दुल सत्तार आणि नितीन राऊत् हे जुने सहकारी आहेत. सत्तार काँग्रेसमध्ये असताना हे दोघेही सोबत विधानभवनात काम करत होते. तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात दोघेही मंत्री होते. यामुळे दोघांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. काल मुंबईहून नागपूरला जाताना सत्तार आणि राऊतांची भेट झाली आणि यावेळी नितीन राऊतांनी अब्दुल सत्तारांना घरी चहापानास निमंत्रित केल्याची माहिती आहे.

राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती व अन्य नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. पंचनामे करण्यासाठी तलाठी गावात आल्यावर मंदिर, मशिदीतील भोंग्यातून याबाबत शेतकऱ्यांना माहिती द्यावी, अशी सूचना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. नागपूर विभागातील अतिवृष्टीचा आढावा घेण्यासाठी येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आज बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सत्तार यांनी ही माहिती दिली. यावेळी राज्यातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये म्हणून शासन कटीबद्ध असल्याचेही सत्तार म्हणाले.