महाराष्ट्र

दीड महिन्यापूर्वी आम्ही देखील 50 थर लावून एक कठीण हंडी फोडली- CM शिंदे

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

19 Aug :- ठाण्यातील टेंभीनाका परिसरातील दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता शिंदेंनी चांगलीच टोलेबाजी केली. गोविंदांना संबोधित करताना शिंदे म्हणाले, दीड महिन्यापूर्वी आम्हीदेखील हंडी फोडली. ही हंडी फोडणे अतिशय कठिण होते. मात्र, बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादामुळे 50 थर लावून आम्ही ही हंडी फोडली.

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दीघे यांच्या मार्गदर्शनाखाली टेंभीनाका येथे शिवसेनेतर्फे दरवर्षी दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. मात्र, एकनाथ शिंदे यांच्य बंडामुळे आजच्या दहीहंडी उत्सवाला केवळ शिंदे समर्थकांचीच हजेरी होती. अभिनेत्री श्रद्धा कपूरनेदेखील या उत्सवाला हजेरी लावली होती. विशेष म्हणजे श्रद्धा कपूरने यावेळी मराठीमध्ये उपस्थितांशी संवाद साधला. एकनाथ शिंदे यांनीही याबद्दल श्रद्धा कपूरचे अभिनंदन केले.

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, स्वर्गीय आनंद दीघे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेला टेंभीनाक्यातील दहीहंडी उत्सव म्हणजे ठाण्याची शान आहे. राज्यभरातून मुंबईत जाणारे गोविंदा पथक पहिले टेंभीनाका येथे हजेरी लावूनच मुंबईला जातात. ठाण्याचा मुख्यमंत्री व्हावा, ही आनंद दीघे यांची इच्छा होती. ती इच्छा आपण पूर्ण केली. याचा अतिशय आनंद असल्याचेही शिंदे म्हणाले.

शिंदे म्हणाले, हंडी फोडण्याचे काम अतिशय कठिण असते. त्यामुळे सर्व काळजी घेऊनच हंडी फोडा. पुढे शिंदे म्हणाले, तुमच्याप्रमाणेच आम्हीदेखील दीड महिन्यापूर्वी एक कठिण हंडी फोडली. ही हंडी अतिशय कठिण होती. मात्र, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि तुमच्या आशीर्वादामुळे 50 थर लावून ही हंडी फोडता आली. मी मुख्यमंत्री झालोय, असे अजूनही मला वाटत नाही. एक सर्वसामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला आहे. त्यामुळे तुम्ही सर्वच मुख्यमंत्री झाला आहात. आमचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. ते सर्वसामान्यांसाठीच काम करत राहिल.

महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि परंपरा असलेल्या दहीहंडी खेळाला क्रीडा प्रकार म्हणून मान्यता देत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. त्याचा पुनरुच्चार करत शिंदे म्हणाले, पुढील वर्षी शासकीय स्तरावरही दहीहंडी खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. दहीहंडीच्या ‘प्रो गोविंदाट स्पर्धांच्या बक्षिसाची रक्कम शासनामार्फत दिली जाईल. त्याचबरोबर खेळाडू संवर्गातून गोविंदांना शासकीय नोकरी देण्यात येईल. त्यांच्यासाठी 5 टक्के आरक्षण ठेवले जाईल.