महाराष्ट्र

सामंतांचं विधान! आणखी काही आमदार शिंदे गटात सामील होणार?

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

18 Aug :- १७ ऑगस्टपासून महाराष्ट्राच्या विधानसभेत पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला चांगलंच धारेवर धरलं आहे. मागील दोन दिवसांपासून महाविकास आघाडीतील नेत्यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर उभं राहून सत्ताधारी पक्षाविरोधात घोषणाबाजी केली आहे. “गद्दार सरकारचा धिक्कार असो… ईडी सरकार हाय हाय… ५० खोके… एकदम ओके” “गद्दारांना भाजपाची ताट – वाटी… चलो गुवाहाटी… चलो गुवाहाटी…” अशा घोषणा दिल्या आहेत.

सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या घोषणाबाजीनंतर बंडखोर आमदार उदय सामंत यांनी सूचक विधान केलं आहे. घोषणाबाजी करणाऱ्या गटात उभे असलेले काही आमदार लवकरच शिंदे गटात सामील होतील, अशा आशयाचं विधान त्यांनी केलं आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

संबंधित घोषणाबाजीबाबत प्रत्युत्तर देताना उदय सामंत म्हणाले की, “तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यात पुन्हा बघितलं तर लक्षात येईल की, किती लोकं नाराज आहेत? किंवा किती लोकं नाईलाजानं तिथे बसले आहेत? काही लोकं तर घोषणाही देत नाहीत. मी सांगितल्यानंतर आता ते उद्यापासून घोषणा देतील… पण काही लोकं घोषणाही देत नाहीत, हे तथ्य आहे. त्यातील काही आमदारांनी विकासावर विश्वास ठेवून एकनाथ शिंदेंसोबत चर्चा केली आहे. त्यामध्ये तिन्ही पक्षातील लोकं आहेत.

भविष्यात तुम्हालाही कळेल की, जे लोकं घोषणा देत नव्हते किंवा नाईलाजानं तिथे बसले होते, त्यातील काही आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत. तो दणकादेखील आपल्याला भविष्यात दिलेला दिसेल” असं विधान उदय सामंत यांनी केलं आहे.