बीड

खळबळजनक दावा! अपघात झाला त्यावेळी मेटे कारमध्ये नव्हते…

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

18 Aug :- शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे रविवारी अपघाती निधन झाले. मात्र, हा अपघात आणि की घातपात याबाबत तपास सुरू आहे. दरम्यान, मेटे यांच्या भाच्याने अपघाताबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. “ज्या वेळी अपघात झाला त्यावेळी मेटे गाडीमध्ये नव्हते”, असा खुलासा मेटे यांचे भाचे बाळासाहेब चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळे मेटेंच्या अपघाती निधनाबाबत आता अधिकच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर विनायक मेटेंच्या गाडीला अपघात झाल्याने रविवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणामध्ये पोलिस अपघात की घातपात या दिशेने तपास करत असतानाच आता हा दावा समोर आल्याने प्रकरणाला आणखीन एक वळण मिळाले आहे.

“विनायक मेटे यांनी जागी प्राण सोडला आहे. हे समजल्यानंतर मी ड्रायव्हर एकनाथ कदमला फोन केला होता. त्याने सांगितले की साहेब बरे आहेत, साहेबांना काही झाले नाही, मी 20 मिनिटांपासून साहेबांसोबत बोलतोय, ते व्यवस्थित आहेत, अशी माहिती ड्रायव्हर एकनाथ कदम यांनी दिली. मात्र, मी विनायक मेटे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी फोन उचलला नाही, त्यामुळे ड्रायव्हर एकनाथ कदमने दिलेल्या त्या माहितीचा नेमका काय अर्थ घ्यायचा?” असा सवाल बाळासाहेब चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमधून उपस्थित केला आहे.

पुढे माहिती देताना चव्हाण म्हणाले की, गेली 12 वर्षांपासून हा चालक त्यांच्यासोबत काम करत होता. 13 ऑगस्ट रोजी वाहनाच्या अती वेगासाठी चलान झाले होते. दुसऱ्या दिवशी पहाटे मला शिवसंग्रामचे पदाधिकारी तुषार काकडेंचा फोन आला. साडेपाचच्या सुमारास आलेल्या या फोन कॉलवर त्यांनी मला मेटेंच्या गाडीचा अपघात झाल्याचे सांगितले. आपल्याला तातडीने निघावे लागेल असेही ते म्हणाले. त्यानंतर मी मेटेंचे खासगी सचिव विनोद काकडेंना फोन करून वाहन चालक कोण होता वगैरे यांची माहिती घेऊन त्यांच्याशी संपर्क साधला.”

पुढे माहिती देताना चव्हाण म्हणाले की, “मेटेंसोबत एकनाथ कदम असल्याचे समल्यानंतर मी त्याला फोन करून विचारणा केली असता त्याने सुरुवातीला मला ओळखले नाही. त्याला मी अपघाताचे नेमके ठिकाण कोणते आहे हे समजण्यासाठी मोबाईलवरुन पाठवण्यास सांगितले असता त्याने ते ही पाठवले नाही. तो सारखा रडत होता. मात्र मी लोकेशन विचारले असता तो उत्तरास टाळाटाळ करत होता. मी दुसऱ्या क्रमांकावरून फोन केला असता त्याने मला आवाजावरून ओळखलं.”

“मी त्याच्याकडे मदतीसंदर्भात विचारणा केली. तसेच मेटे यांची प्रकृती कशी आहे याची विचारणा केली असता त्याने, साहेबांना एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या केवळ डोक्याला व पायाला मार लागल्याचेही त्याने सांगितले. अपघातानंतर जवळ-जवळ 20 मिनिटं मी त्याच्याशी बोलत होतो. अखेर त्याने दुसऱ्या व्यक्तीकडे फोन दिला. त्यानंतर त्या व्यक्तीने मला नेमका अपघात कुठे झाला याची माहिती दिली.

दुसऱ्या व्यक्तीने मेटे यांचा जागीच मृत्यू झाल्याचेही सांगितले. त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्यासोबत असणारा पोलिस कर्मचारी बेशुद्धावस्थेत असल्याचीही माहिती त्या व्यक्तीने दिली. तसेच चालक गंभीर झाल्याचेही ते म्हणाले.” असा खुलासा चव्हाण यांनी केला.

“मेटे यांच्या गाडीचा अपघात हा टोल नाक्यापासून 20-25 मिनीटांच्या अंतरावर झाला. सीसीटीव्हीत ते गाडीमध्ये दिसत आहेत. ड्रायव्हर मात्र मोबाईलवर कोणाशी तरी बोलताना सीसीटीव्हीत दिसत आहे. त्यामुळे हा अपघात घडला की घडवून आणला याची चौकशी झाली पाहिजे. चालक एकनाथ कदम हा सातत्याने त्याचे जबाब बदलत असून यासंदर्भात सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.” अशी मागणी चव्हाण यांनी केली.