मंत्रिमंडळाचा पाळणा हलला, पण पाळण्याच्या दोऱ्या कोणाकडे? शिवसेनेचा सवाल
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
10 Aug :- क्रांती दिनाचा मुहूर्त काल शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी निवडला गेला. आता काही लोक बेइमानी, विश्वासघातालाच ‘क्रांती’ म्हणत असतील तर शिंदे गटाच्या मंत्र्यांनी आपापल्या दालनात लखोबा लोखंडेच्या तसबिरीच लावाव्यात.
महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही. त्यांची औटघटकेची मंत्रिपदे त्यांनाच लखलाभ ठरोत. मंत्रिमंडळाचा पाळणा हलला, पण पाळण्याच्या दोऱ्या कोणाकडे आहेत असा सवाल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून करण्यात आला.
शिवसेनेने टीका केली की, किचकाने द्रौपदीचा विनयभंग केला, मांडीवर थाप मारून तो वारंवार पापाची भाषा बोलत होता म्हणून भीमाने किचकाची मांडीच फोडली. फडणवीस यांच्या दोन्ही मांड्यांवर पापाचीच ओझी शिंदे गटाने ठेवली आहेत आणि हे पाप महाराष्ट्राच्या माथी मारण्याचे कार्य मंत्रिमंडळ विस्ताराने पुढे नेले आहे, ही महाराष्ट्राची बदनामीच आहे. दिल्लीच्या दरबारात महाराष्ट्र मागच्या रांगेत गेलाच आहे.
मुखपत्रातून शिवसेनेने टीका केली की, 40 दिवसांनंतर शिंदे-फडणवीसांचे सरकार बाळंत झाल्याचे पेढे वाटण्यात आले, पण पाळण्यात नक्की काय आहे? ते समजायला मार्ग नाही. भाजप व शिंदे गट मिळून 18 मंत्र्यांना शपथ देण्यात आली. मंत्र्यांना शपथ देताना राज्यपालांचा चेहरा आनंदाने न्हाऊन निघाला होता.
फार मोठे ईश्वरी कार्य आपल्या हातून पार पडल्याचा आविर्भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता, पण राज्यपालांनी 40 दिवसांपूर्वी एका बेकायदा सरकारला शपथ दिली व आता त्याच बेकायदा सरकारच्या मंत्र्यांना शपथ देऊन घटनेचा अपमान केला आहे.