महाराष्ट्र

पवारांचा गंभीर आरोप! म्हणाले, भाजप त्यांच्यासोबतच्या मित्रपक्षांना…

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

10 Aug :- महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर आता बिहारमध्येही राजकीय उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळालं. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपासोबतची युती तोडून राजदसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारयांना विचारलं असता, त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. भाजप त्यांच्यासोबत असणाऱ्या मित्रपक्षांनाच संपवतो असं मत शरद पवार यांनी मांडलं आहे. यावेळी त्यांनी अनेक उदाहरणेही दिली.

पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाचं उदाहरण दिलं. तसेच अकाली दलाला भाजपाने संपवल्याचा आरोपही केला. ‘पंजाबमध्ये अकाली दल हा मोठा पक्ष भाजपसोबत होता. प्रकाशसिंग बादल यांच्यासारखा मोठा नेताही त्यांच्यासोबत होता. आज तो पक्ष जवळपास संपुष्टात आला आहे,’ असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

‘भाजपने महाराष्ट्रात शिवसेनेत फूट कशी पडेल, अशी परिस्थिती निर्माण केली. अशीच खेळी बिहारमध्ये सुरू होण्याआधीच नितीश कुमार वेळीच सावध झाले. त्यांनी तातडीने राजीनामा दिला. आता भाजपाचे नेते त्यांच्यावर टीका टिप्पणी करत आहेत. परंतू नितीश कुमार यांनी टाकलेले पाऊल शहाणपणाचे आहे, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

यावेळी शरद पवार यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या रस्सीखेचावरून आपलं मत मांडलं आहे. ‘ज्या वेळेस मी कॉंग्रेस पक्षातून बाहेर पडलो त्यानंतर मी पक्षाच्या चिन्हावर हक्क दाखविला नाही अथवा त्यांचे चिन्ह घेतले नाही. वेगळा पक्ष काढला आणि वेगळ चिन्ह घेतलं. त्यामुळं धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. एखाद्या पक्षाचे चिन्ह काढून घेणं योग्य नाही’ असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान राज्यात झालेल्या नव्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावर पवार यांनी मी त्यावर बोलणार नाही, राज्यातील नेते बोलतील असेही स्पष्ट केले.