महाराष्ट्र

महिला व बाल कल्याण विभागाची जबाबदारी संजय राठोड सांभाळतील; प्रियांका चतुर्वेदींचा उपरोधिक टोला!

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

9 Aug :- राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच पार पडला असून शिंदे गटातील ९ आणि भाजपाच्या ९ नेत्यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. या मंत्रीमंडळ विस्तारात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात गंभीर आरोप झालेले संजय राठोड यांनाही मंत्रीपद मिळालं आहे. यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीदेखील यावरून टीका केली आहे.

यानंतर आता शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनीही मंत्रीमंडळ विस्तारावरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्र सोडलं आहे. मंत्रीमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाच्या एकूण २० नेत्यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. यामध्ये एकाही महिलेचा समावेश नाही, याच मुद्द्यावरून चतुर्वेदी यांनी नवीन सरकावर टीका केली आहे.

भारतीय जनता पार्टीसाठी महिला सन्मान किंवा महिला सशक्तीकरण केवळ शब्दांपुरतं मर्यादीत आहे. कृती करण्याची वेळ येते तेव्हा भाजपामधील महिलाविरोधी विचार समोर येतात, अशी टीका त्यांनी केली आहे. त्या ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी संवाद साधत होत्या.

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. यामध्ये एकाही महिलेला स्थान मिळालं नाही. सरकारमध्ये ‘महिला व बाल कल्याण’ विभाग असतो, याची जबाबदारी कुणाला मिळेल? असा प्रश्न विचारला असता, प्रियांका चतुर्वेदी उपरोधिक टोला लगावत म्हणाल्या की, मला पूर्ण विश्वास आहे, महिला व बाल कल्याण विभागाची जबाबदारी संजय राठोड सांभाळतील.

भाजपा महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ, शिंदे गटाच्या नेत्या यामीनी जाधव, अपक्ष आमदार गीता जैन, पंकजा मुंडे अशा अनेक महिला नेत्या असताना, एकाही महिलेला मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. त्यामुळे महिला व बाल कल्याण विभागाची जबाबदारी संजय राठोड यांना मिळेल.