पुढील 4 दिवस पाऊस पुन्हा झोडपणार
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
8 Aug :- पावसाने शनिवारी काही ठिकाणी उघडीप दिली. मात्र, आता महाराष्ट्रासह दक्षिणेकडील 4 ते 5 राज्यांत पावसाला अनुकूल वातावरण आहे. रविवारी अनेक ठिकाणी पाऊस झाला. सोमवारपासून 15 आगस्टपर्यंत पुन्हा मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे पट्टा तयार झाल्याने राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील जिल्ह्यांसोबतच मुंबईसाठीही 8, 9 आणि 10 ऑगस्टला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिन्ही दिवस 100 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आहे. दरम्यान, सध्या कोकणात देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे. विविध ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर, नांदेड यासह कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी याठिकाणी पाऊस पडत आहे. मुंबईतही पावसाने चांगली हजेरी लावली आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील पारवा आणि साखरा या सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
मान्सूनचा आस सक्रिय असून तो त्याच्या सरासरी जागेपासून दक्षिणेकडे स्थलांतरित झाला. तो आगामी 4 ते 5 दिवस आहे त्याच जागेवर स्थिर राहण्याची शक्यता आहे. बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारपट्टीवर चक्रीय वाऱ्याची स्थिती असून त्याच ठिकाणी सात किलोमीटर उंचीवर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे डिप्रेशनमध्ये रूपांतर झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह दक्षिणेकडील 4 ते 5 राज्यांत पावसाला अनुकूल वातावरण तयार झाले आहे.- माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ.
विदर्भात पुढील तीन दिवसांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 10 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मान्सून देशाच्या बहुतांश भागात सक्रिय झाला आहे आणि त्याच्या सामान्य स्थितीच्या दक्षिणेस स्थित आहे. यासोबतच उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्रही कायम आहे. तसेच पूर्व-मध्य आणि लगतच्या ईशान्य अरबी समुद्राच्या मध्यभागी समुद्रसपाटीपासून 3.1 किमी आणि 5.8 किमी दरम्यान Cyclonic Circulation आहे. म्हणूनच या हवामान हालचालींमुळे देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे.