आशिया चषकाआधी टीम इंडियाला मोठा धक्का
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
8 Aug :- येत्या 27 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. पण त्यासाठी लवकरच संघाची घोषणाही केली जाणार आहे. पण त्या संघात एक मोठं नाव दिसणार नाही. ते नाव आहे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराचं. दुखापतीमुळे जसप्रीत बुमरा आशिया कपमध्ये खेळणार नसल्याची माहिती आहे. कर्णधार रोहित शर्मासह टीम इंडियासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यानं पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार बुमरा पाठीच्या दुखण्यामुळे आशिया चषकाच खेळू शकणार नाही. बुमरा भारताचा महत्वाचा गोलंदाज आहे. त्यामुळे आगामी विश्वचषकाच्या आधी तो पूर्णपणे फिट व्हावा असं आम्हाला वाटतं. त्यामुळे त्याची सध्याची दुखापत पाहता आम्ही कोणतीही जोखीम स्वीकारणार नाही. असंही या अधिकाऱ्यानं पीटीआयशी बोलताना सांगितलं.
दरम्यान इंग्लंड दौऱ्यातल्या वन डे मालकेत तो शेवटचा खेळला होता. त्यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी बुमराला विश्रांती देण्यात आली होती. पण यादरम्यान पाठीचं दुखणं बळावल्यानं बुमराला आशिया चषकाला मुकावं लागणार आहे.
तब्बल चार वर्षानंतर होणारी ही स्पर्धा 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरदरम्यानं यूएईत खेळवली जाणार आहे. आणि महत्वाची बाब ही की भारताचा सलामीचा सामना रंगणार आहे तो पाकिस्तानशी. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर 28 ऑगस्टच्या संध्याकाळी ही लढत होणार आहे. पण बुमराच्या दुखापतीमुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी भारताची डोकेदुखी वाढणार आहे.