महाराष्ट्र

मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त सापडला?

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

8 Aug :- सत्तासंघर्षात अडकलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त सापडला. उद्या सकाळी 11 वाजता मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यात एकनाथ शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, उदय सामंत, संजय शिरसाट, दादा भुसे, संदीपान भुमरे यांच्या नावाची चर्चा आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात बैठक झाली. त्यात 15-35 च्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाल्याचेही सूत्रांनी सांगितले. याचबरोबरच 10 ऑगस्टपासून विधीमंडळाचे अधिवेशन असल्याने सचिवालयातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची उद्याची मोहर्रमची सुटी रद्द करण्यात आली आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराचे चित्र उद्या स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते नांदेडमध्ये आले असता बोलत होते. शिंदे हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शिंदे यांचे आज नांदेड येथील श्री गुरू गोविंदसिंहजी विमानतळावर आगमन झाले. विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर काहीही ठोस उत्तर दिले नाही. मात्र, मंत्रिमंडळात नक्की कोणती नावे असतील..? कुणाला संधी मिळेल..? याबाबत या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला उद्या मिळतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, ज्येष्ठ आमदार आशिष शेलार आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांना भाजपच्या कोट्यातून मंत्री बनवण्याची चर्चा सुरू आहे. मात्र या नेत्यांना सायंकाळी उशिरापर्यंत शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रण मिळाले नाही.

मुंबईत विधानसभेच्या एकूण 36 जागा आहेत. त्यापैकी 16 जागा सध्या भाजपच्या ताब्यात आहेत. भाजपने आपले एक आमदार राहुल नार्वेकर यांची यापूर्वीच विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत मुंबईतून भाजपच्या कोणत्या आमदाराला मंत्री बनवतात? याचा खुलासा होऊ शकला नाही.