स्वातंत्र्य दिनापूर्वीच होईल मंत्रिमंडळ विस्तार; मुनगंटीवार यांचा दावा
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
4 Aug :- येत्या 15 ऑगस्टपूर्वी राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार नक्की होईल, असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. स्वातंत्र्य दिनापूर्वी शपथविधी झालेला असेल, असा दावा मुनंगटीवार यांनी केला आहे. गेल्या महिनाभरापासून राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. त्यावरुन विरोधकांकडून भाजप व शिंदे गटावर जोरदार टीका केली जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगत आहेत. मात्र, विस्तार नेमका कधी होणार याबाबत त्यांनी अद्याप स्पष्ट भाष्य केलेले नाही. अशात भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी 15 ऑगस्टपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार नक्की होणार, असे सांगितले आहे.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, येत्या 15 ऑगस्टरोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. या अमृतमहोत्सवी वर्षात झेंडावंदन करण्याआधी सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे मंत्र्यांच्या शपथविधीची नेमकी तारीख सांगता येत नसली तरी येत्या 15 ऑगस्टपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार हे नक्की.
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी वारंवार दिल्ली वारी करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली आहे. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आज शिंदे यांच्याऐवजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. बंडखोर आमदार अपात्र ठरल्यास भाजपसमोर काय पर्याय आहेत. तसेच, मंत्रिमंडळ विस्तार कधी करायचा, याबाबत ते पक्षश्रेष्ठींशी चर्चा करु शकतात.
शिंदे गट व भाजपमध्ये खातेवाटपावर एकमत होत नसल्यानेच मंत्रिमंडळ विस्तार रखडले आहे, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. मात्र, आता भाजप आणि शिंदे गटात खातेवाटपाबाबत एकमत झाल्याची माहिती आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळात 35 जणांना संधी मिळणार आहे. त्यातील 40 टक्के वाटाला शिंदे गटाला मिळणार आहे. मात्र, महत्त्वाचे गृह आणि वित्त विभाग हे दोन्ही खाते भाजपकडेच जाणार असल्याची माहिती आहे.