News

पेट्रोल-डिजेलच्या किमतीत झाली वाढ

नवी दिल्ली, 7 जून : देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी हळूहळू अनेक राज्यांमधील जनजीवन सुरू होत आहे. लोक घराबाहेर पडत असल्याचं दिसून येत आहे. येत्या काही दिवसात कोरोनासह महागाईचा चटका सहन करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पेट्रोल-डिझेलची मागणीत सुधारणा होत आहे. त्याच वेळी, क्रूड तेलाची किंमत प्रति बॅरल 40 डॉलरपेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे आज पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतीत प्रति लिटर 60-60 पैशांची वाढ करण्यात आली. लॉकडाऊन दरम्यान, गेल्या काही दिवसात तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी) पेट्रोल आणि डिझेलच्या आधारभूत किंमतीत बदल केला नाही. 16 मार्च रोजी इंधनाच्या किंमतीत बदल झाला आहे.

लॉकडाऊन दरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील चढ-उतारांना राज्य सरकार जबाबदार आहेत. खरं तर राज्यांचा महसूल वाढवण्यासाठी व्हॅट किंवा सेसमध्ये वाढ झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ नोंदवली आहे. लॉकडाऊन दरम्यान रोखीच्या संकटाला झटत असलेल्या बहुतेक राज्य सरकारांनी इंधनावरील कर लावून त्यांची आवश्यकता पूर्ण केली आहे.

मे महिन्यात केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये आणि डिझेलवर 13 रुपये प्रतिलिटर वाढ केली. यानंतरही दोन्ही इंधनांच्या किरकोळ किंमतीत कोणताही बदल झाला नाही. वास्तविक, उत्पादन शुल्कात झालेली वाढ कच्च्या तेलाच्या कमी किंमतींसह समायोजित केली गेली. देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये झालेला बदल कच्च्या तेलाच्या किंमतींच्या आधारे ठरविला जातो. कारण आम्ही आपल्या 80 टक्के क्रूड तेल आयात करतो.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत बॅरलच्या तीन महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. एप्रिलमध्ये कच्चे तेल प्रति बॅरल 30 डॉलरच्या खाली गेले.  2019 च्या अखेरच्या वेळेपेक्षा अजूनही कच्च्या तेलाची किंमत कमी आहे. एप्रिलमध्ये पेट्रोल आणि डिझेलची मागणीही निम्मी झाली. प्रत्यक्षात लॉकडाऊनमुळे अनेक कारखाने व कार्यालये बंद पडली होती. त्याच वेळी लोक घराबाहेर न जाण्याच्या निर्बंधामुळे रस्त्यावर वाहने नव्हती.

इंडियन ऑईलच्या म्हणण्यानुसार एप्रिल 2020 मध्ये पेट्रोलियम उत्पादनांची मागणी 46 टक्क्यांनी घटली आहे. एप्रिल 2019 च्या तुलनेत या काळात पेट्रोलचे 61 टक्के, डिझेलचे 56.7 टक्के आणि एटीएफच्या विक्रीत 91.5 टक्के घट झाली आहे. गेल्या महिन्यात सरकारने लॉकडाऊन शिथिल केल्याने मे महिन्यात एप्रिलच्या तुलनेत पेट्रोलियम उत्पादनांची मागणी सुधारली. मे 2019 च्या तुलनेत पेट्रोल, डिझेल आणि जेट इंधनाची मागणी 38.9 टक्के कमी होती. 8 एप्रिलपासून देशातील मॉल आणि बाजार सुरू झाल्याने इंधनाची मागणी वाढेल.