सर्व दिवस सारखे नसतात, भाजपचे बेसूर राजकारण; ठाकरेंची टीका
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
1 Aug :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली. सर्वच दिवस सारखे नसतात. आता तुमची सत्ता आहे. पण, हे दिवस फिरले तर तुमचे काय होईल, याचा तरी विचार करा, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला. संजय राऊत यांच्याविरोधातील ईडीच्या कारवाईचा ठाकरेंनी तीव्र शब्दांत निषेध करुन संजय राऊत यांचा आपल्याला अभिमान असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्रातील शिवसेना संपण्याच्या मार्गावर आहे, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले होते. या वक्तव्याचा उद्धव ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतला. उद्धव ठाकरे म्हणाले, नड्डांचे हे वक्तव्य देशाला हुकुमशाहीकडे नेणारे आहे. देशातील सर्वच लोकांनी आपले कान, डोळे उघडे ठेवून देश कुठे चालला आहे, हे पहायला हवे. तसेच, देशाला हुकुमशाहीकडे नेण्यासाठी भाजपला मदत करायची की नाही, यावर सामान्यांनी विचार करण्याची वेळ आली आहे.
काल जे. पी. नड्डा म्हणाले होते, इतर पक्षात 30, 40 वर्षे काम करुन अनेकजण आता भाजपमध्ये येत आहेत. देशात केवळ भाजप हा एकच पक्ष आहे, जो संपणार नाही. केवळ भाजप टीकणार. महाराष्ट्रातील शिवसेना पक्ष तर संपण्याच्या मार्गावर आहे. या वक्तव्यांचा उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला. ठाकरे म्हणाले, नड्डांचे हे वक्तव्य देशाला एकछत्री अंमल व हुकुमशाहीकडे नेणारा आहे. भाजपमध्ये इतर पक्षातून लोक आले आहेत. त्यामुळे वंशवेल वाढण्यासाठी भाजपचा वंश आहेच कुठे.
ठाकरे म्हणाले, देशात भाजपतर्फे सध्या अत्यंत भेसूर आणि निर्घृण राजकारण सुरू आहे. भाजपसोबत जे जातील, तेच आपले. जे भाजप गुलाम होतील ते काही काळ आपले. त्यांचा वापर संपल्यानंतर त्यांना दूर करायचे, हेच भाजपचे राजकारण आहे. राजकारण बुद्धीबळासारखे करायचे असते, असे आतापर्यंत समजत होतो. मात्र, आता बुद्धी नाही तर केवळ बळाचा वापर केला जात आहे.
संजय राऊत यांचा आपल्याला अभिमान असल्याचे ठाकरे म्हणाले. ठाकरे म्हणाले, संजय व माझे कौटुंबिंक संबंध आहे. संजय कट्टर शिवसैनिक आहे. संजय राऊतांचा मला अभिमान आहे. अजून वेळ गेलेली नाही. प्रत्येकाची वेळ बदलत असते. माझ्यासोबत असलेले खासदार आणि आमदार हे निष्ठावान व कट्टर शिवसैनिक आहेत.
ठाकरे म्हणाले, हिटलरने आपल्या विरोधकांना संपवण्यासाठी अत्यंत निर्घृण राजकारण केले. देशातही आता असेच भेसूर राजकारण सुरू आहे. काँग्रेसने देशावर 60, 65 वर्षे राज्य केले. मी अडीच वर्ष मुख्यमंत्री होते. पण कधी गर्व केला नाही. मात्र, आता आम्ही म्हणून तेच सत्य असा प्रकार सुरु आहे.