महाराष्ट्र

खोतकरांचे डोळे पाणावले! जड अंतःकरणाने केला ठाकरेंना जय महाराष्ट्र…

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

30 July :- शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांनी अखेर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. जालन्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत खोतकरांनी ही घोषण केली. यावेळी खोतकरांचे डोळे पाणावलेले दिसले. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला जालन्याच्या विकासासाठी पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे. आज सकाळी मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. माझ्यावर बेतलेल्या प्रसंगाची त्यांना माहिती दिली. संजय राऊतांशीही बोललो. सगळ्यांची मते जाणून घेऊन मी शिंदेगटात जाण्याचा निर्णय घेतला.

खोतकर म्हणाले की, एखाद्याला समर्थन दिले म्हणजे काही संबंध तुटत नसतात. चाळीस वर्षांपासून आमचे (ठाकरेंशी) संबंध आहेत. त्यांना मेसेज करून माहिती दिली आहे. माझ्या काही कौटुंबिक अडचणी आहेत. शेवटी घरी आलं की आपल्याला कुटुंब दिसत असतं, असं म्हणत त्यांनी मजबुरीने शिंदे गटात जात असल्याचं सूचित केलं.

खोतकर पुढे म्हणाले की, ‘आजपर्यंत शिवसेनेची प्रामाणिकपणे सेवा केली. मी व माझ्या सहकाऱ्यांनी सेनेचे जालन्यात वर्चस्व निर्माण केले. सामान्य माणसांनीही आमच्यावर विश्वास टाकला. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभा निवडणुकीपर्यंत मतदारांनी आमच्या झोळीत भरभरून मतदान टाकले. पक्षश्रेष्ठींनी टाकलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी घरी आलं की कुटुंब दिसतं, काही ठोस निर्णय घेणे गरजेचे होते. ही बाब मी पक्ष प्रमुख ठाकरेंच्याही कानावर घातली. त्यांनीही मला माझा निर्णय घेण्याची परवानगी दिली,’ ही माहिती देताना खोतकरांचे डोळे पाणावले होते.

भावुक होत खोतकर पुढे म्हणाले की, मी एकाही शिवसैनिकाला माझ्यासोबत या असे म्हणालो नाही. उपनेतेपदाचा राजीनामा देणार का? या प्रश्नावर ते म्हणाले की, हे स्पष्टच आहे, शिंदे गटात आल्यावर उपनेतेपदाचा राजीनामा द्यावाच लागेल. मी अद्याप राजीनामा दिलेला नाही, पण देईन.

शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांच्या जालना येथील निवासस्थानावर अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने आठ महिन्यांपूर्वी छापा टाकला होता. औरंगाबादमध्येही एका उद्योगपती आणि व्यावसायिकाच्या घरावर ईडीचे छापे सुरू होते. खोतकर यांच्याशीही संबंधित असल्याची चर्चा होती. त्याआधी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर जालना सहकारी साखर कारखाना बेनामी पद्धतीने खरेदी करण्याच्या नावाखाली 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची पत्नी आणि सासरे यांचाही खोतकरांनी खरेदी केलेल्या साखर कारखान्यात भागधारक असलेल्या कंपनीत सहभाग असल्याचे सोमय्या यांनी उघड केले होते.

सोमय्या म्हणाले होते की, खोतकर यांनी जालना जिल्ह्यातील रामनगर साखर कारखान्याच्या मदतीने 100 कोटींचा घोटाळा केला आहे. या घोटाळ्याची पुराव्यासह ईडी, आयकर विभाग, ठाकरे सरकार आणि केंद्रीय सहकार मंत्रालयाकडे तक्रार करण्यात आली आहे. खोतकर यांनी निनावीपणे रामनगर साखर कारखाना स्वत:च्या पैशाने विकत घेतला आहे. 2012 मध्ये खोतकर साखर कारखान्याच्या मदतीने 100 कोटींचा घोटाळा करण्याचा कट रचल्याचे त्यांनी सांगितले होते. हा घोटाळा कसा झाला याची सर्व माहिती पुराव्यासह ईडी आणि आयकरला देण्याचेही त्यांनी बोलून दाखवले होते.

साखर कारखान्याच्या जमिनीवर कॉम्प्लेक्स बांधण्याचा कट खोतकर यांनी रचल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. आज साखर कारखान्याच्या जमिनीची किंमत १ हजार कोटींहून अधिक आहे. रामनगर साखर कारखान्यातील घोटाळ्याबाबत शेतकऱ्यांनी माझ्याकडे तक्रार केल्यानंतर मी सर्व पुरावे गोळा करून 100 कोटींचा घोटाळा बाहेर काढला, असेही ते म्हणाले होते. दरम्यान, आता खोतकरांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदे- फडणवीस सरकारला समर्थन देत असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे खोतकरांची ठाकरेंची साथ सोडण्याची कौटुंबिक अडचण ती हीच का, अशीही चर्चा रंगली आहे.