राजकारणमहाराष्ट्र

मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून धक्का तंत्राचा वापर; अनेक दिग्गजांना डच्चू मिळण्याची चर्चा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

दि. 25 जुलै :- भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षातील सर्व इच्छुकांना मंत्रिमंडळात स्थान देता येणार नाही हे स्पष्ट केले. यामुळे इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. यात भाजपकडून धक्कातंत्राचा वापर करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. शिंदे गटातील 13 ते 14 जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याने भाजपमधील इच्छुकांना आापला नंबर लागणार की नाही, अशी धाकधूक आहे.

शिवसेना – भाजप युतीच्या काळात कॅबिनेट आणि राज्यमंत्री म्हणून जवळपास 43 जणांचा समावेश करण्यात आला होता. मात्र, त्या काळात मंत्रिपद भूषवलेले काही जण कुठल्या ना कुठल्या कारणाने आता पुन्हा मंत्रिपदावर दिसणार नाहीत.

गुजरातमध्ये पहिल्यावेळेस निवडून आलेल्या आमदारांना मंत्रिपदे देण्यात आल्याने तसे झाले तर देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार, विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय, डॉ. रणजित पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, प्रा.राम शिंदे, मेघना बोर्डीकर यांची राज्यमंत्रिमंडळात वर्णी लागू शकते. या व्यतिरिक्त चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांना संधी मिळू शकणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात ज्येष्ठ नेत्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे, दिलीप कांबळे, विद्या ठाकूर, सुधीर मुनगंटीवार, बबनराव लोणीकर, प्रवीण पोटे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता नसल्याची चर्चा सुरू आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतून कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, संदीपान भुमरे, राज्यमंत्री शंभूराज देसाई, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह अपक्ष राज्यमंत्री राजेंद्र यड्ड्रावार, आणि बच्चू कडू यांनी मंत्रिपदावर असताना शिंदेंना पाठिंबा दिला. यांच्यासह संजय शिरसाट, तानाजी सावंत, संजय राठोड, दीपक केसरकर, योगेश कदमांसह प्रताप सरनाईक, यामिनी जाधव यांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे. यातील मविआमध्ये मंत्रिपद असणाऱ्यांना मंत्रिपद मिळणार असल्याचे स्पष्ट असले, तरी या व्यतिरिक्त कुणाची वर्णी मंत्रिमंडळात लागू शकते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.