फडणवीसांचे ‘मविआ’वर टीकास्त्र; गत अडीच वर्षांत अघोषित आणीबाणी होती आता…
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
23 July :- राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर आता मोकळा श्वास घेता येत आहे, कारण गेली अडीच वर्ष ही आपल्या संघर्षाची होती, ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एक असे सरकार आले त्यांने फक्त सुड घेण्याचे काम केले, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. पनवेलमध्ये भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले की, सामान्य कार्यकर्ता, व्यक्ती, पत्रकार असो एक अघोषित आणीबाणी महाराष्ट्रामध्ये होती, आमच्या विरोधात बोलले तर घर तोडू, जेलमध्ये टाकू, पोलिस स्टेशनमध्ये फिरवू, अशी आणीबाणी या महाराष्ट्रात तयार झाली होती. ज्या प्रकारे अनाचार, दुराचार, अत्याचार आणि भ्रष्टाचाराने परिसीमा गाठली होती, त्याच्या विरुद्ध सातत्याने आपण संघर्ष करत होतो आणि आज मला असे वाटते की राज्यातील जनता खुले श्वास घेत आहे.
पुढे ते म्हणाले की, आपली कार्यकारिणी अतिशय भरगच्च झाली, असून विविध विषयांवर आपण चर्चा केली, मंथन केले. महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा रयतेचे राज्य आल्यानंतर पहिली कार्यकारिणी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड या ठिकाणी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे गड जिंकल्यानंतर कधी थांबायचे नाही, त्या गडाची डागडुजी करायचे, त्यानंतर पुढच्या गडाकडे मार्गक्रमण करायचे, आपल्याला देखील हेच करायचे आहे, आपण महाराष्ट्रातील सत्तेचा गड जिंकलोय, पण आपण हे सगळे मानणाऱ्यांपैकी आहेत की, सत्ता हे आपले साध्य नाहीये, ते आपले साधन आहे. सामाजिक, आर्थिक, परिवर्तनाचा उपक्रम म्हणून आपण सत्तेकडे पाहतोय आणि म्हणून गड जरी आपण जिंकलो असलो तरीही जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाची जी यात्रा सुरू केली आहे, त्या यात्रेत अग्रेसर असलेला महाराष्ट्र गेल्या अडीच वर्षांमध्ये मागे पडला आहे, तो महाराष्ट्र पुन्हा एकदा वेगाने विकासाच्या आणीबाणीत अव्वल क्रमाकांवर आणणार आहे.
मला अनेक लोकं विचारतात हे कसं घडलं, मी त्यांना एवढेच सांगेल की, हे सरकार यावे ही श्रीची इच्छा होती, या ठिकाणी ईश्वर कोण आहे, श्री कोण आहेत, ईश्वराला तर आपण मानतोच पण या महाराष्ट्रातली 12 कोटी जनतेची अशी इच्छा होती की, परिवर्तन व्हावे, त्यामुळे हे परिवर्तन झाल्याचे फडणवीस म्हणाले. पुढे फडणवीस म्हणाले की, जनतेला लक्षात येत नव्हते की, सरकार तर आहे पण सरकार कोण आहे, नेमकं कोण सरकार चालवतेय, त्यावेळी मी सांगायचो की, सरकार भगवान भरोसे सुरू आहे, त्यामुळे राज्याची परिस्थिती वेगळी सांगायची आवश्यकता नाही.
पुढे मविआ टोला लगावत फडणवीस म्हणाले की, काही लोकांना असे वाटत असेल की, सत्तेकरता आपण परिवर्तन केले, हे परिवर्तन सत्तेकरीता नाहीये, ज्यावेळी आम्ही सगळे बघायचो की, महाराष्ट्राला विकासाच्या गतीकडे नेले आणि महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर गती कमी झाली, प्रगतीचे सर्व कार्यक्रम बंद करण्यात आले, एक प्रकारे जणू जे-जे चांगले आहे चे करायचेच नाही आम्हाला, अशी मविआची भूमिका होती.
केंद्र सरकारने कोट्यवधी रुपये देऊन विविध क्षेत्रातले प्रकल्प सुरू केले, मात्र हे सगळे प्रकल्प बंद करण्याचे काम मविआने केले. मग मला असे वाटयचे की, खुर्ची येतात जातात, मी खुर्चीचा विचारच केला नाही, ही जी राज्याची अवस्था दिसत होती, त्यानंतर मला असे वाटायचे की, कशाकरता हे सरकार आहे.
पहिल्या दिवसांपासून आपण मनात एक गाठ बांधली आहे की, एकीकडे बदला घेण्यासाठी सरकार चालवायचं आणि दुसरीकडे भ्रष्टाचार करायचा, असे जर हे सरकार करत असतील, तर त्यांनी एक दिवस देखील झोपू द्यायचे नाही, असे मी ठरवले होते आणि ते भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी यशस्वी करुन दाखवल्याचेही फडणवीस म्हणाले.