मनावर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्री केले; चंद्रकांत पाटलांचे विधान
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
23 July :- मनावर दगड ठेवून आपण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. त्यावेळी आपल्या सर्वांना दुःख झाले. ते दु:ख पचवून पुढे गेलो कारण आपल्याला गाडा पुढे न्यायचा होता, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केले. पनवेलमध्ये भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक सुरू असून या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. दरम्यान, या विधानाने आता भाजपमधील खदखद समोर येत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासह 40 शिवसेना आमदारांनी बंड केले. तर 10 अपक्षांनी शिंदे यांना साथ दिल्याने 50 आमदारांनी एकत्र येवून भाजपच्या सहकार्याने सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. पण अचानक केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावली. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीदाची शपथ घ्यायला लावली. त्यामुळे राज्यात शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना झाली. या निर्णयानंतर भाजपमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात होते.
शनिवारी पनवेलमध्ये भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले की, राज्यातील सरकार पडल्यानंतर राज्यात सत्ता स्थापनेच्या वेळी केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. आपल्याला दुःख झाले. पण आपण दुःख पचवून पुढे गेलो कारण आपल्याला गाडा पुढे हाकायचा होता. सलग पाच वर्षे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिले आहेत. आपल्याला मुंबई महापालिका जिंकायची आहे, असंही पाटील यावेळी म्हणाले.
प्रदेश कार्यकारिणीच्या बैठक संपल्यानंतर भाजप नेते तथा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन कार्यकारिणीत पारित झालेल्या ठरावाबाबत माहिती दिली. याप्रसंगी पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याबद्दल विचारणा केली असता, शेलार म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या भावना आपल्या भाषणातून व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल कसा झाला याची देखील चौकशी केली जाईल, असे शेलार यांनी माध्यमांशी बोलताना सांगीतले.