महाराष्ट्र

शिंदेच्या बालेकिल्ल्यात घुसून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

21 July :- खाऊन-खाऊन अपचन झालेल्यांनी पाठित खंजीर खुपसला आहे, असा हल्लाबोल गुरुवारी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात जावून केला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेने आता स्थानिक पातळीवर कबर करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी शिवसेनेने राज्यभर शिवसंवाद यात्रेचे आयोजन केले आहे.

या यात्रेची सुरुवात आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील भिवंडी येथून करण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेनेने आपली संवाद यात्रा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानासमोर नेले. एकनाथ शिंदेंच्या गडात शिवसैनिकांनी “कोण आला रे कोण शिवसेनेचा वाघ आला” अशा जोरदार घोषणाबाजी केल्या. यादरम्यान मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेना अडचणीत सापडली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये शिंदे सेनेला धडा शिकवण्यासाठी शिवसेनेने स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घरासमोर गाडी थांबवून आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. याठिकाणी त्यांचे जोरदार स्वागतही करण्यात आले.

एकनाथ शिंदेंचे नाव न घेता आदित्य ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, “खाऊन-खाऊन अपचन झालेले लोक सोडून गेलेत, तसेच जे आज बंड आणि उठाव केल्याचे सांगत आहेत त्यांनी उठाव नव्हे ही गद्दारी केली. हे लोक हक्काने घरी यायचे, कामं घेऊन यायचे आणि नवी जबाबदारी मागायचे, कुटुंबातील माणसाप्रमाणे त्यांना आजवर शिवसेनेने संभाळले आणि आज त्यांनीच पाठित खंजीर खुपसला, ज्या शिवसेनेने त्यांना एक ओळख दिली त्या पक्षासोबत त्यांनी गद्दारी केली.

शिवसैनिकांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवसैनिक असते तर हिंमतीने उभे राहिले असते. आम्ही उठाव आणि बंड केला असे ते म्हणत आहेत. पण, तो बंड आणि उठाव नव्हता. ती गद्दारी होती. उठाव करण्यासाठी हिंमत लागते. बंड करण्यासाठी ताकद लागते. ते महाराष्ट्रात थांबले असते. सूरत आणि तेथून गुवाहाटीला पळून गेले नसते. पूर आलेल्या आसाममध्ये ही आपले लोक मजा मारून आले.

आमदारांपाठोपाठ खासदारही एकनाथ शिंदेंसोबत गेल्यामुळे शिवसेना अडचणीत आली आहे. शिवसेना वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनता आणि शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. तीन दिवसीय शिवसंवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्यात भिवंडी, नाशिक, दिंडोरी, औरंगाबाद आणि अहमदनगरमधील शिर्डीमधील शिवसैनिक आणि नागरिकांशी आदित्य ठाकरे संवाद साधतील.