मंत्रिमंडळ विस्तार बाबत उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
20 July :- न्यायालयीन प्रक्रिया आणि मंत्रिमंडळाचा विस्तार या दोहोंत काहीही संबंध नाही. त्यामुळे लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करु, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शिंदे गट व शिवसेनेच्या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. त्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, शिंदे गट तसेच शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. या सुनावणीचा मंत्रिमंडळ विस्तारावर परिणाम होणार नाही. दोहोंचा एकमेकांशी संबंध नाही. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करु.
फडणवीस म्हणाले, आज सुप्रीम कोर्टात जी सुनावणी झाली त्यावर आम्ही पूर्ण समाधानी आहोत. आमची बाजू योग्य असल्याने कोर्टाचा निर्णय आमच्याच बाजूने येईल, असा विश्वास आहे. कोर्टात आता हे प्रकरण सुरु असल्यामुळे कोण चुकीचे, कोण बरोबर यावर अधिक बोलणे योग्य होणार नाही.
आज सुनावणीत आमदारांच्या पात्रतेबाबत ‘जैसे थे स्थिती’ ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. यावरुन शिंदे गटातील आमदारांना दिलासा मिळाल्याची चर्चा करण्यात येत आहे. त्यावर फडणवीस म्हणाले, कोर्टाने फक्त शिंदे गट व शिवसेनेने ज्या नोटीसा आमदारांना पाठवल्या आहेत, त्यावर ‘जैसे थे’चे आदेश दिले आहेत. म्हणजेच पुढील आदेशापर्यंत आमदारांवर कोणतीही कारवाई करु नका, असे दोन्ही बाजूंना सांगितले आहे. याचा चुकीचा अर्थ लावू नये.
कोर्टातील सुनावणीबाबत फडणवीस यांनी सांगितले की, आमदारांच्या अपात्रतेचा विषय हा संवेदनशील असल्याने शिंदे गटाची वकिलांनी बाजू मांडण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. कोर्टाने ती मागणी मान्य करत आता दोन्ही बाजूंना शपथपत्र देण्याचे सांगितले आहे. हा संविधान पीठाचा विषय असल्याचेही कोर्टाचे म्हणणे दिसते.