ठाकरे कडाडले! म्हणाले, बंडखोरांना जागा दाखवल्याशिवाय…
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
19 July :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी भाजप व पक्षाच्या बंडखोर आमदारांवर कडाडून हल्ला चढवला. ‘सध्या भाजपच्या मदतीने शिवसेनेच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपच्या या कटाला शिवसेनेचे काही नेते बळी पडलेत. ते पक्षाचे नाव चोरण्याचा प्रयत्न करत आहेत.
कुणी माझ्याकडे एखादी गोष्ट मागितली तर मी सर्वकाही देईन. पण कुणी ती हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर मात्र, त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,’ असे ते म्हणालेत. ते शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या ऑनलाईन बैठकीत बोलत होते.
शिवसेनेचे 12 खासदार मंगळवारी बंडखोरांत सहभागी झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात त्यांनी मंगळवारी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन आपल्या गटाला मान्यता देण्याची मागणी केली. या घटनेमुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ आहे. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या बंडखोर नेत्यांना धडा शिकवण्याचा निर्धार केला आहे.
उद्धव यांनी मंगळवारी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांशी ऑनलाईन संवाद साधला. त्यात त्यांनी सध्या शिवसेनेच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले -सद्यस्थितीत आपल्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न होत आहे. मला एखादी गोष्ट मागितली तर मी तुम्हाला सर्वकाही देईल. मग माझ्यापुढे गद्दार असू दे किंवा अन्य कुणी. त्याने काहीही फरक पडत नाही. पण कुणी माझ्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर मात्र, त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.