कदमांच्या अश्रूंचा फुटला बांध! शिवसेना पवारांनीच फोडली, आत्मपरीक्षण करा…
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
19 July :- शरद पवारांनीच शिवसेना फोडली. 50 आमदार का गेले, याचे उद्धवसाहेबांनी आत्मपरीक्षण करावे, असे आवाहन रामदास कदम यांनी केले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. यावेळी त्यांच्या अश्रूंचा बांध फुटलेला पाहायला मिळाला. रामदास कदम म्हणाले, मी लहान माणूस आहे. आपल्याला सल्ला द्यायचा मला अधिकार नाही, पण 50 आमदार का गेले, 12 खासदार का जातायत याचे आपण आत्मपरीक्षण करावे.
शरद पवारांनी शिवसेना फोडली. अजित पवारांनी डाव साधला आणि शिवसेनेच्या आमदारांना संपवण्याचा डाव आखला. राष्ट्रवादीच्या आमदारांना शिवसेनेच्या वाट्याचाही निधी मिळाला. त्यामुळेच एकनाथ शिंदे गटाने हे पाऊल उचलले, असा हल्लाबोल त्यांनी केला.
मागील काही दिवसांपासून रामदास कदम पक्षनेतृत्वावर नाराज होते. आपली ही नाराजी कदम यांनी आज उद्धव ठाकरे यांना पत्रामार्फत कळवत पक्षनेतेपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रामदास कदम यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. ते म्हणाले, 1970 पासून मी शिवसेनेत सक्रिय आहे. गेली 52 वर्षे मी पक्षासाठी दिले. स्वप्नातही वाटले नव्हते की या पदाचा कधी राजीनामा देईल. आम्ही उभे केलेले हे साम्राज्य पत्त्यासारखे कोसळतांना पाहून वाईट वाटत आहे.
बाळासाहेबांनी ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोध केला त्याच पक्षाच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले. तुम्ही सर्वांना भीक दिली असे का म्हणताय. तुम्ही शरद पवार, सोनिया गांधी यांना का सोडत नाहीत. आज बाळासाहेब असते तर त्यांनी तुम्हाला हे करू दिले असते का? संपूर्ण बंडखोरीचा उद्धव ठाकरेंनीही विचार करावा. आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला रामदास कदम यांनी दिला.
मराठवाड्यात मी खूप निधी वाटप केला. आपली मान उंचावली जाईल असेच कार्य केले. आई भवानीची, बाळासाहेबांची शप्पथ घेऊन सांगतो किरीट सोमय्यांना मी कधी बोललो नाही. अजित पवारांनी अडीच वर्षांत वाट लावून टाकली. त्यांच्याच आमदारांना निधी मिळत होता. शरद पवारांनी शिवसेना फोडली, असा आरोपही त्यांनी पवारांवर केला.
राजीनामा देऊन मी समाधानी नाही. खूप अस्वस्थ आहे. शिवसेना आम्ही उभी केली. मी पाठीत खंजीर खुपसणारा नाही. राजीनाम्याची वेळ येईल अस वाटले नव्हते. मात्र, आता याआधी जसे काम केले तसे करणार. बाहेर पडणार आणि महाराष्ट्र पिंजून काढणार. हकालपट्टी करण्याआधी आमचे योगदानही बघायला हवे होते. प्रत्येक गोष्टीत मी आपल्या छातीची ढाल बनून पुढे होतो. कोण काय करतय हे समजतय. जगलो तर पक्षासाठी, मेलो तरी भगव्या झेंड्यासाठी. आमची कितीही हकालपट्टी केली, तर भगव्याची साथ सोडणार नाही. असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
अजून किती जणांना पक्षातून काढणार, असा सवाल रामदास कदम यांनी यावेळी उपस्थिती केला. आपल्या आजुबाजूच्या चांडाळ चौकडीला बाजू सोडा, असे म्हणत संजय राऊतांवर टीका केली. तसेच जे आदित्य ठाकरे आधी काका काका करायचे त्यांनीच माझे मंत्रालय घेतले, असेही कदम यावेळी म्हणाले. आदित्य ठाकरे मंत्रालयात येऊन बैठका लावायला लावायचे. आम्हीही ठाकरे असल्याने सहन केले, असेही कदम म्हणाले.