‘या’ कारणामुळे अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
18 July :- विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी बारामतीमधील कामांना दिलेली स्थगिती उठवावी. तसेच, सूडबुद्धीने कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणी यावेळी अजित पवारांनी केली. मविआने मंजूर केलेल्या 941 कोटींच्या नगर विकास विभागांच्या कामांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच स्थगिती दिली.
विशेष म्हणजे यापैकी तब्बल 245 कोटींची कामे ही बारामती नगरपरिषदेच्या माध्यमातून होणार होती. त्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज अजित पवारांसह राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे व हसन मुश्रीफ यांनी मुख्यंमत्री दालनात एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
मुख्यमंत्री शिंदे यांनी नुकतीच स्थगित केलेली 941 कोटींची कामे ही 2021च्या अर्थसंकल्पातील होती. त्यामुळे त्यांचा निधी आता रोखू नये, अशी मागणी अजित पवार यांनी केली. यावेळी धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ यांनीही आपल्या मतदारसंघातील कामांबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. यावर मुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली हे समजू शकलेले नाही. अजित पवारांनी आपल्या मागण्यांबाबतचे निवेदनही मुख्यमंत्री शिंदे यांना दिले.
शिवसेनेच्या आमदारांना राष्ट्रवादीकडून निधी दिला जात नव्हता, असा आरोप करत शिवसेना आमदारांसह एकनाथ शिंदेंनी बंड केले होते. त्यानंतर सत्तेत येताच मविआ सरकारने मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देण्याचा धडाका मुख्यमंत्री शिंदे यांनी लावला आहे. विशेषत: काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांना मंजूर झालेला निधीला स्थगिती दिली जात आहे. अद्याप शिवसेना आमदारांच्या कोणत्याही कामांना स्थगिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारसंघातील कामांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे.