महाराष्ट्र

नर्मदेत कोसळली बस! 13 मृतदेह हाती

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

18 July :- मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील खलघाट येथे सोमवारी सकाळी महाराष्ट्र परिवहनची बस नर्मदा नदीत कोसळली. त्यात 40 प्रवासी होते. आतापर्यंत 13 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. उर्वरितांचा शोध सुरू आहे. सकाळी 10 ते 10.15 च्या दरम्यान हा अपघात झाला.

खलघाट येथील दुपदरी पुलावर एका वाहनाला ओव्हरटेक करताना बस अनियंत्रित झाल्याचे सांगण्यात येत आहे. चालकाचा तोल गेला आणि बस रेलिंग तोडून नदीत पडली. बस इंदूरहून महाराष्ट्रातील अमळनेरला जात होती. इंदूर ते घटनास्थळाचे अंतर सुमारे 90 किमी आहे.

गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या अपघातावर दोन वक्तव्ये केली. प्रथम त्यांनी 15 प्रवाशांना जिवंत बाहेर काढल्याचा दावा केला. मात्र, एकही प्रवासी जिवंत सापडला नसल्याचे घटनास्थळी उपस्थित रुग्णवाहिकेच्या चालकाने सांगितले. सुमारे दोन तासांनंतर गृहमंत्र्यांनी पुन्हा सांगितले की, बसमध्ये फक्त 14 ते 15 लोक होते आणि कोणालाही वाचवता आले नाही. मात्र, बसमध्ये किती प्रवासी होते? याला प्रशासनाकडून अद्याप दुजोरा मिळालेला नाही.

बसमध्ये महिला आणि लहान मुलांसह 40 प्रवासी होते. आतापर्यंत 13 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यामध्ये 8 पुरुष, 4 महिला आणि 1 लहान मुलाचा समावेश आहे. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी 15 प्रवाशांना जिवंत बाहेर काढल्याचा दावा केला आहे. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या रुग्णवाहिकेच्या चालकाने सांगितले की, आतापर्यंत एकही प्रवासी जिवंत सापडला नाही.

अपघातात प्राण गमावलेल्यांपैकी आतापर्यंत 11 जणांची ओळख पटली आहे. 4 जण राजस्थानचे, 1 इंदूर (मध्य प्रदेश) आणि उर्वरित महाराष्ट्रातील आहेत. मृतदेह धामनोद (धार, मध्य प्रदेश) येथील शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. चेतन राम गोपाल जांगीड, नांगल कला गोविंदगड (जयपूर- राजस्थान)
जगन्नाथ हेमराज जोशी, (70) मल्हारगड (उदयपूर – राजस्थान)
प्रकाश श्रावण चौधरी, (40) शारदा कॉलनी अमळनेर (जळगाव – महाराष्ट्र)
निबाजी आनंदा पाटील, (60) रा. पिलोदा अमळनेर (जळगाव – महाराष्ट्र)
चंद्रकांत एकनाथ पाटील, (45) अमळनेर (जळगाव – महाराष्ट्र)
अर्वा मुर्तजा बोरा, (27) मूर्तिजापूर (अकोला – महाराष्ट्र)
सैफुद्दीन अब्बास, नुरानी नगर (इंदूर- मध्य प्रदेश)
राजू तुळशीराम मोर, रावतभाटा (चितौडगड – राजस्थान)
अविनाश संजय परदेशी, पाटण सराई, अमळनेर (जळगाव – महाराष्ट्र)
विशाल सतीश बाहेरे, (33) विरदेल (धुळे, महाराष्ट्र)
रुख्मणीबाई नारायणलाल जोशी (उदयपूर- राजस्थान)


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांना म्हणाले की, बस अपघाताची घटना अतिशय दुर्दैवाची आहे. मी दोन वेळा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी चर्चा केली आहे. ते स्वत:देखील या घटनेविषयी गंभीर आहेत. एक मंत्रीदेखील त्यांनी तेथे नेमलेले आहेत. राज्य शासनाच्या वतीने मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर करत असून शासन मृतांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदनशील आहे.