महाराष्ट्र

गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र मंत्रालय हवं- संभाजीराजे

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

17 July :- छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र मंत्रालय हवं, अशी मागणी राज्यसरकारकडे केली आहे. राज्यातील अनेक गडकिल्ल्यांची अवस्था अत्यंत जीर्ण स्वरुपाची झाली असून पावसाळ्यात तटबंदी ढासळण्याचे प्रकार घडतात. त्यानंतर तात्पुरत्या स्वरुपाची डागडुजी केली जाते. पण असे प्रकार घडणे नेहमीचेच झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र मंत्रालय किंवा महामंडळ असावं, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरद्वारे केली आहे.

त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, “महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक असणारे शिवाजी महाराजांचे गडकोट आज अत्यंत दुरावस्थेत आहेत. दिवसेंदिवस त्यांची अधिकच दुरावस्था होत आहे. पन्हाळा गडाची तटबंदी अथवा बुरुज ढासळणं, हे तर नेहमीचेच झालं आहे. हा ऐतिहासिक वारसा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल, तर त्याच्या संवर्धनासाठी दीर्घकालीन व भरीव योजना राबवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वंतत्र मंत्रालयाची अथवा किमान महामंडळाची निर्मिती करावी” अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.