महाराष्ट्र

उद्धव ठाकरे पिंजणार महाराष्ट्र; पक्षबांधणीसाठी उतरणार रस्त्यावर

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

17 July :- एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. बंडखोरांना न गोंजारता पक्ष पुन्हा ताकदीने उभा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहेत. शनिवारी ठाकरे यांनी पक्षबांधणीसाठी महाराष्ट्राचा दौरा करण्याची घोषणा केली.

पक्षाला पूर्ववैभव मिळवून देण्यासाठी आणि तो अधिक मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ते ठिकठिकाणी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या बैठका आणि मेळावे घेणार आहेत. शिंदे गटाला आव्हान देण्यासाठी उद्धव ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षाला बळकटी देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे.

शिंदे गटाच्या बंडानंतर उद्धव ठाकरे हे सातत्याने पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत. लहान कार्यकर्त्यापासून ते मोठ्या नेत्यापर्यंत ठाकरे हे मातोश्री आणि सेना भवन येथे त्यांची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन करत आहेत. राज्यातील पावसाचा अंदाज घेऊन लवकरच उद्धव ठाकरे आपला महाराष्ट्र दौरा जाहीर करणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची आखणीही करण्यात येत आहे. त्यांचा दौरा मुंबईपासूनच सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्येक जिल्ह्यत जाऊन ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत.