महाराष्ट्र

शिंदे-ठाकरे गटातील वाद संपणार?

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

17 July :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची येत्या एक-दोन दिवसांत भेट हेणार असल्याचा दावा सेना नेत्या दीपाली सय्यद यांनी केला आहे. या दोघांनाही शिवसैनिकांच्या भावनांचा आदर आहे. त्यामुळे त्यांची भेट होणार असल्याचे समजल्याने खूप चांगले वाटत आहे, असे सय्यद आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्यात. या ट्विटमध्ये त्यांनी भाजप नेत्यांचेही आभार मानलेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध अटकळींना पेव फुटले आहे.

दिपाली सय्यद या बंडाच्या वेळेपासूनच शिंदे आणि ठाकरे यांनी एकमेकांशी चर्चा करावी, अशी भूमिका घेत होत्या. त्यांनी 16 जुलैला रात्री 11 च्या सुमारास केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की- येत्या दोन दिवसांत आदरणीय उद्धवसाहेब आणि आदरणीय शिंदेसाहेब शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करुन पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार, हे समजल्यावर खूप बरे वाटले.

शिंदे साहेबांना शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धवसाहेबांनी कुटुंबप्रमुखाची भूमिका मोठ्या मनाने निभावली हे स्पष्ट झाले आहे. या मध्यस्थीकरता भाजपा नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद. चर्चेच्या ठिकाणाची प्रतीक्षा असेल.

पंकजा मुंडें, आणि विनोद तावडे यांच्या मध्यस्थीने ही चर्चा होण्याचा शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिपाली सय्यद यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांना टॅग करण्यात आले आहे. पंकजा मुंडेंना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बहिण मानतात तर राज्याच्या राजकारणात सक्रिय नसलेले विनोद तावडे हे देखील राष्ट्रीय राजकारणात मोठ्या पदावर असून ते उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे.

भाजपकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांच्या मुंबई भेटीच्या वेळी त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घ्यावी, यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरु होते. मात्र ती भेट झाली नाही. यानंतर आता उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटून चर्चा करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.