स्वार्थी राजकीय फायद्यासाठी नामांतर; खा जलील यांचा हल्लाबोल
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
16 July :- शिवसेना असो की भाजप सर्वांनीच आपल्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी महापुरुषांच्या नावांचा वापर केला, औरंगाबादचे नामांतर हे त्याचेच एक उदाहरण आहे, औरंगाबादच्या जनतेला आठ दिवसांऐवजी रोज पाणी कधी देणार? असे म्हणत औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी एकापाठोपाठ तीन ट्विट करत शिवसेनेसह भाजपवर हल्ला चढवला.
आज पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये औरंगाबादसह उस्मानाबादचे नामांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय शिंदे सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा हा निर्णय यापूर्वीच माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून शेवटच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. पण ती बैठक बहुमताच्या सरकारची राज्य मंत्रिमंडळ बैठक नसल्याने तो निर्णय अवैध असल्याचे सांगत आज पुन्हा औरंगाबादसह उस्मानाबादच्या नामांतराच्या निर्णयावर शिंदे सरकारकडून शिक्कामोर्तब करण्यात आला आहे, त्यावरुन इम्तियाज जलील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
खासदार जलील आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, शिवसेना आणि भाजपने नेहमीच स्वार्थी राजकीय फायद्यासाठी महापुरुषांची नावे वापरली. औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजी असे करणे हे त्याचे एक उदाहरण आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसलाही या ऐतिहासिक शहराच्या नामांतराचे श्रेय हवे होते, असा टोला त्यांनी लगावला.
जलील दुसऱ्या ट्विटमध्ये म्हणतात की, हे पक्ष आता औरंगाबादच्या जनतेला दर आठ दिवसांऐवजी रोज पाणी कधी देणार हे सांगू शकतील का? आता तरुणांना नोकऱ्या मिळू लागतील का? ते आमचे क्रीडा विद्यापीठही परत आणतील का? इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर केव्हा मिळेल, असा सवालही त्यांनी केला आहे.
जलील ट्विटमध्ये म्हणतात की, आमचे पासपोर्ट/आधार/पॅन/शैक्षणिक कागदपत्रे बदलण्यासाठी कोणाचे शुल्क आकारले जाईल, हेही सरकार कळवेल का? आज रस्त्यावर नाचणारे सगळे रांगेत उभे राहून ही कामे सामान्यांसाठी करून देतील का. औरंगाबादला फक्त नावाची नाही तर विकासाची गरज आहे, नामांतराच्या निर्णयाने आपण दुःखी झाल्याचे ते म्हणाले.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नामांतर केले. तेव्हापासून या नामांतरावरून सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. एमआयएमने सुरुवातीपासूनच याला विरोध केला असून, याविरोधात मुकमोर्चा देखील काढण्यात आला होता. औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामांतर करण्याचा उद्धव ठाकरे सरकारचा निर्णय अवैध असल्याचे सांगत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हे दोन्ही निर्णय नव्याने घेण्यात आले. त्यावरुन आता राज्यात टीका-टिप्पणी केली जात आहे.