महाराष्ट्र

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

15 July :- १८ जुलैपासून सुरु होत असलेले विधानसभेचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. महाराष्ट्र विधिमंडळाने अधिकृत पत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आहे. मात्र, हे अधिवेशन पुढे ढकलण्यामागचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही.

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन येत्या १८ जुलैपासून सुरु होणार होते. पण संसदीय कार्य विभागाच्या सूचनेनूसार हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. अधिवेशनाची नवी तारीख जाहीर करण्यात आलेली नसून संसदीय कार्य विभागाने कळवल्यानंतर पुढची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

करोनामुळे मागील दोन वर्षापासून नागपूर हिवाळी अधिवेशन झालेले नाही. त्यामुळे आगामी पावसाळी आणि हिवाळी अधिवेशन नागपुरात घ्यावे, अशी मागणी चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी विधानसभेत बोलताना केली होती. या मागणीचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी समर्थन करीत नव्या सरकारने याकडे लक्ष देऊन पावसाळी व हिवाळी अधिवेशन नागपुरात घ्यावे, असे म्हटले आहे.

नागपूर करारानुसार दरवर्षी राज्य विधिमंडळाचे एक अधिवेशन नागपुरात घेतले जाते. परंतु करोनामुळे २०२० चे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेण्यात आले नाही. पावसाळी अधिवेशनाच्या समाप्तीनंतर हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर २०२१ पासून नागपूरला होईल, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, ते अधिवेशनही मुंबईतच घेण्यात आले.

विदर्भातील कामगारांचे प्रश्न, उद्योगधंदे, बेरोजगारी, कृषी, शेतकरी आत्महत्या, रस्त्यांची दुरवस्था, अवकाळी पावसाने झालेली पिकांचे नुकसान, सिंचन, पर्यटन, उद्योग गुंतवणूक, सर्वांगीण विकास, विदर्भातील असे अनेक प्रश्न प्रलंबित असून यावर उपाययोजना करण्यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला फार महत्त्व आहे.