राज्यातील 92 नगरपरिषदांच्या निवडणुका वेळेतच होणार: सर्वोच्च न्यालयाचे निर्देश
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
दि.12 जुलै: राज्यातील 92 नगरपरिषदांच्या निवडणुका वेळेतच होणार असल्याचे आज स्पष्ट झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने हे महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ओबीसी राजकीय आरक्षणा शिवाय जाहीर झालेल्या निवडणुका पार पडणार आहेत. मात्र उर्वरित निवडणूकीसाठी नवीन अधिसूचना न काढण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
ओबीसींच्या आरक्षण मुद्यावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पाडली. राज्य सरकारने बांठिया आयोगाचा अहवाल सादर केला आहे. या पार्श्वभूमीवर आज सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले होते. ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असणारी ट्रिपल टेस्ट पूर्ण केली असल्याचे राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाला सांगितले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमात कोणताही बदल न करण्यास सांगितले. त्याशिवाय, नवीन निवडणुका जाहीर न करण्याचे निर्देश दिले आहेत. ओबीसी आरक्षणाबाबतची पुढील सुनावणी आता 19 जुलै रोजी होणार आहे.
निवडणूक आयोगाकडून जाहीर झालेल्या 92 नगर परिषदांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणासह करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न होता. सर्वोच्च न्यायालयात पावसाळा आणि इतर प्रशासकीय अडचणी सांगत या निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वकिलांनी केला. मात्र, निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यामुळे या निवडणुकांत बदल होणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. जाहीर झालेल्या निवडणुकांच्या अधिसूचनेत कोणताही बदल करू नये असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे राज्यातील 92 नगरपरिषदांच्या निवडणुका वेळेत आणि ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडणार आहेत हे आता स्पष्ट झाले आहे.
20 जुलै रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहिर करतील.
22 जुलै ते 28 जुलै 2022 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. दि.23 व 24 जुलै सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 29 जुलै 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे 4 ऑगष्ट पर्यंत. मतदान 18 ऑगष्ट 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत असेल. 19 ऑगष्ट 2022 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल.