राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे बोलणार…
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
11 July :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे गुरु पौर्णिमेनिमित्त बुधवारी मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर ते प्रथमच सर्वांच्या समोर येतील. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ते प्रथमच बोलणार असल्याने ते काय बोलतील, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहेत.
राज्यामध्ये शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर राज ठाकरे प्रथमच समोर येणार आहेत. सत्तांतराच्या आधी म्हणजेच विधान परिषद निवडणूक तसेच राज्यसभा निवडणुकीच्या वेळी मनसेच्या आमदाराने भाजपला साथ दिली होती. आता सत्ता स्थापनेनंतर मनसेला मंत्रीपद देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, त्याला विरोधाचीही तयारी केली जातेय, या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय बोलणार? हे महत्त्वाचे ठरणार आहे.
महाराष्ट्र निर्माण सेनेला मंत्रीपद देण्याची चर्चा सुरू असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मात्र या निर्णयाला विरोध करणार असल्याचे म्हटले आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापनेत किंवा निवडणुकीतही मनसेची कोणतीच भूमिका नव्हती. त्यामुळे आता मनसेला मंत्रीपद देण्याचा काहीही संबंध नसल्याचे आठवले यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. इतकेच नाही तर तसा निर्णय झाला, तर आपण त्याला विरोध करणार असल्याचे देखील आठवले यांनी म्हटले आहे.