महाराष्ट्र

पक्ष चिन्हावरुन ठाकरे-शिंदे आमने-सामने

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

11 July :- शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण आहे, त्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय निवडणूक आयोगाने घेऊ नये, कोणताही निर्णय घेण्याआधी आमची बाजू ऐकून घ्यावी, अशी विनंती शिवसेनेकडून निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे. शिवसेनेतून चाळीस आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड केले. त्यानंतर शिवसेना कुणाची हा वाद सध्या रंगला. शिवसेना नेमकी कुणाची आणि कोण बेकायदेशीर हा वाद सध्या कोर्टात पोहोचला आहे. सुप्रीम कोर्टात आज यावर सुनावणी पार पडली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती दिली आहे.

आज सकाळी शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी बजावलेल्या अपात्रतेच्या नोटिसीच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांना या प्रकरणी सुनावणी पूर्ण होईपर्यंत बंडखोर आमदारांवर कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश दिलेत. न्यायालयात एकनाथ शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाल्यामुळे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटात सध्या मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे.

‘शिवसैनिकांनो, नव्या चिन्हासाठी तयार राहा’, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे. शिंदे गटाने शिवसेना पक्ष व चिन्हावर दावा केला आहे. अशा परिस्थितीत आपल्या हातातून चिन्ह गेल्यास पक्षाचे नवीन चिन्ह घरोघरी पोहोचवण्यास तयार राहा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केल्या आहेत.

दुसरीकडे 40 बंडखोर आमदारांनंतर एकनाथ शिंदे गटात ठाणे, नवी मुंबईतील बहुतांश नगरसेवक सामिल झाले आहेत. याशिवाय शिवसेनेच्या 18 खासदारांपैकी काही खासदारही आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. परिस्थिती पाहता, शिंदे गट दिवसेंदिवस मजबूत होत असल्याचे दिसून येत आहे. आमचाच शिवसेना पक्ष खरा असल्याचे शिंदे गटाचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून कायदेशीर लढाईसाठीही जोर लावला जात आहे. मुंबई, दिल्लीतील कायदेतज्ज्ञ, वकीलांसोबत शिवसेना नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. यामध्ये कोण बाजी मारणार हे आता येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होण्याची शक्यता आहे.