महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करा; राष्ट्रीय बालहक्क आयोगाचे पोलिसांना निर्देश

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

11 July :- राष्ट्रीय बालहक्क आयोगाने मुंबई पोलिसांना युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्याविरोधात FIR दाखल करण्याचे निर्देश दिलेत. आदित्य यांच्यावर आरे बचाव आंदोलनात मुलांचा मजूर म्हणून वापर केल्याचा आरोप आहे. आयोगाच्या या निर्देशांमुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ माजली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने मुंबईची फुफ्फुसे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरे जंगलात मेट्रो कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात पर्यावरणवाद्यांनी आंदोलन केले होते. त्यात आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी आपला या आंदोलना भक्कम पाठिंबा असल्याची घोषणा केली होती.

या आंदोलनात काही बालकांनीही सहभाग घेतला होता. याविरोधात सह्याद्री हक्क मंचाचे विधी प्रमुख ध्रुतीमन जोशी यांनी बालहक्क आयोगाकडे तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन आयोगाने आदित्य विरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिलेत.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने सर्वप्रथम आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सत्तेत आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या सरकारने हा निर्णय रद्दबातल केला होता. तसेच हा प्रकल्प कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता पुन्हा शिंदे सरकारने पुन्हा हा प्रकल्प आरेत हलवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर पर्यावरणवाद्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

सद्यस्थितीत शिवसेनेला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी उद्धव ठाकरे व त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे वेगवेगळ्या उपाययोजना करत आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांसह मतदारांसोबतच्या भेटीगाठीही वाढवल्या आहेत. त्यातच बालहक्क आयोगाने आदित्यविरोधात गुन्हा दाखल केल्याने सेनेच्या गोटात खळबळ माजली आहे.