महाराष्ट्र

मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते महापूजा; पंढरपुरात भक्तांचा कल्लोळ दाटला

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

10 July :- पंढरपुरात आज आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल आणि रुक्मिणीची विधीवत महापूजा करण्यात आली.पंरपरेला अनुसरुन राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे cm eknath shinde यांनी सपत्नीक लता शिंदे यांच्यासोबत महापूजा केली. आज पहाटे 2 वाजून 55 मिनिटांनी विठ्ठल रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्र्यासोबत यावेळी बीड Beed जिल्ह्यातील गेवराई येथील मुरली नवले आणि जिजाबाई मुरली नवले हे दाम्पत्य यावर्षीचे मानाचे वारकरी ठरले.

ज्ञानोबा-तुकोबांचा अखंड जयघोष, पाऊस वाऱ्याची झुळूक अन् शेकडो किलोमीटर चालून आलेल्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पहाटे आषाढीची विठ्ठल-रुक्मिणी महापूजा केली. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांनी पांडुरंगाला साकडे घातले. राज्यातले सर्वच लोक सुखी आणि समृध्द होवो अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यानी विठ्ठलाकडे केली आहे.

उभ्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या भक्तीजागराला आज आषाढीच्या महापूजेने कळस चढवला. विठू माऊलीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी वारीतून पंढरीकडे धाव घेतली आहे. त्यांच्या विठ्ठल दर्शनाची आस आज पुर्ण झाली. इतक्या दिवस शांत असणाऱ्या पंढरपुरात आषाढीच्या निमित्ताने भक्तांचा कल्लोळ दाटला आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेत. शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर शनिवारी पहिल्यांदाच दिल्ली गाठली. तिथे राष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. त्यांना विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट दिली. त्यानंतर हा दौरा आटोपून ते शनिवारी रात्री पुण्यात आले. तेथून रात्री लागलीच मोटारीने पंढरपुरात दाखल झाले.

मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी आज आषाढी वारीतली विठ्ठलाची ही पहिलीच सपत्नीक महापूजा केली. या पूजेपूर्वी त्यांच्या हस्ते ‘पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी’ या अभियानाचा समारोप करण्यात आला. विठ्ठलाची शासकीय महापूजा झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पहाटे साडेपाच वाजता विठ्ठल मंदिर परिसरात इस्कॉन संस्थेतर्फे उभारण्यात येणाऱ्या मंदिराचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर शिंदे हे चंद्रभागा नदीघाटाचे लोकार्पण करणार आहे.