अबब..! बीडमधील ‘त्या’ बोकडाला लाखोंची मागणी
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
9 July :- भारतात वेगवेगळ्या धर्माचे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. त्यातील एक मुस्लिम बांधवांचा सण म्हणजे बकरी ईद. इस्लामिक कालगणनेतील अखेरच्या महिन्याच्या दहाव्या दिवशी बकरी ईद साजरी करण्यात येते. कुर्बानीचा उत्सव म्हणून या ईदचे महत्त्व आहे. यंदा १० जुलैला बकरी ईद साजरी करण्यात येत आहेत. बीडच्या परळीतील कन्हेरवाडी येथे बकरी ईद निमित्त बोकडांना चांगलीच मागणी आली आहे. बीडच्या परळीतील कन्हेरवाडी इथले बाबा फड यांच्या बोकडाला लाखो रुपयांची बोली लागत आहे.
बीडच्या परळीतील कन्हेरवाडी इथले बाबा फड यांच्या बोकडावर तब्बल तीन ते चार लाख रुपयांची बोली लागली आहे. या बोकडाचे वैशिष्ट्य म्हणजे बोकडाच्या कपाळावर चंद्र आहे. त्यामुळेच बाजारात याला चांगली मागणी आलीय. बाबा फड यांनी या बोकडाचे नाव दैवत ठेवलं असून बोकडाच्या संगोपनासाठी त्यांना दिवसाला साडेतीनशे रुपयांचं खाद्य लागते. हे बोकड पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थ आवर्जून येथे येत आहेत.
मुस्लिम समुदायाचे लोक रमजान संपल्यावर किमान ७० दिवसांनंतर बकरी ईदचा सण साजरा करतात. याला ईद-उल-जुहा देखील म्हणतात. ईद-उल-फितर (मिठी ईद) नंतर मुस्लिम समुदायाच्या सर्वात मोठ्या सणांमध्ये एक आहे तो म्हणजे बकरी ईद. या दिवशी मुस्लिम बांधवांच्या घरी बकर्यांची कुर्बानी देण्याची प्रथा आहे.
कुर्बानी दिल्यानंतर मांस समान तीन हिश्श्यांमध्ये गोरगरीब व अनाथ, आप्त व नातेवाईक आणि स्वत: व शेजारी यांना वाटप केले जाते. सकाळच्या विशेष नमाज पठणानंतर ही कुर्बानी देण्यात येते. मुस्लिम बांधवांमध्ये चंद्र दर्शनाला अत्यंत महत्त्व असते, त्यामुळे चंद्र दर्शनानंतर ईद साजरी केली जाते.