महाराष्ट्र

मंदिरात गेले तर प्रसाद संपला, बाहेर आले तर चप्पल चोरीला; खडसेंवर खोचक टीका

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

9 July :- भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे यांच्यावर खोचक टीका केली आहे. मंदिरात गेले तर प्रसाद संपला आणि बाहेर आले तर चप्पल चोरीला गेली, अशी अवस्था एकनाथ खडसे यांची झाली आहे, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे. सोशल मीडियावर होणाऱ्या विरोधाचा आधार घेत त्यांनी हा टोला लगावला आहे.

माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, “मंदिरात गेले तर प्रसाद संपला आणि बाहेर पडले तर चप्पल चोरीला गेली, अशी अवस्था एकनाथ खडसे यांची झालेली आहे. सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात, मी याला योगायोग म्हणेल. एकनाथ खडसे यांच्यामुळेच हा अपशकून घडला, असं मी म्हणणार नाही, पण सोशल मीडियावर म्हटलं जातंय. पण हा योगायोग असतो. राजकारणात सत्ताबदल हा चालूच असतो.” असंही ते म्हणाले.

खरंतर, एकनाथ खडसे यांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यापूर्वी ते भारतीय जनता पार्टीत होते. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली होती. ते निवडून देखील आले. पण शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यामुळे खडसे यांना पुन्हा एकदा विरोधी पक्षात बसावं लागणार आहे. या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी खडसेंविरोधात खोचक टीका केली आहे.