क्रीडा

भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा महामुकाबला

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

7 July :- क्रिकेटचे चाहते नेहमीच भारत-पाकिस्तान यांच्यातल्या मुकाबल्याची आतुरतेने वाट पाहत असतात. आता या दोन्ही देशांच्या क्रिकेट रसिकांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण या दोन्ही टीम लवकरच एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. हा सामना आशिया कपमध्ये होणार आहे. आशिया कपचं आयोजन यंदा श्रीलंकेकडे आहे. ही स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. आशिया कप 2022 ची सुरूवात 27 ऑगस्टपासून होणार आहे, पण अजून स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आलेली नाही.

मीडियामध्ये आलेल्या वृत्तांनुसार आशिया कप सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 28 ऑगस्टला भारत-पाकिस्तान यांच्यातला सामना होऊ शकतो. 28 ऑगस्टला रविवार आहे. आशियाई क्रिकेट काऊन्सिलसह ब्रॉडकास्टर्स या मॅचमधून जास्त टीआरपी मिळण्याची अपेक्षा करत आहे, त्यामुळे रविवारीच ही मॅच होईल, याची शक्यता सर्वाधिक आहे.

आशिया कपमध्ये भारत, श्रीलंका, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांनी आधीच स्वत:चं स्थान निश्चित केलं आहे. याशिवाय युएई, नेपाळ, ओमान, हाँगकाँग आणि इतर टीमना क्वालिफायर राऊंड खेळावा लागणार आहे. टीम इंडिया आशिया कपची गतविजेती आहे. मागच्या स्पर्धेच्या फायनलमध्ये त्यांनी बांगलादेशला धूळ चारली होती.

आशिया कपनंतर टी-20 वर्ल्ड कपमध्येही भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) होणार आहे. या वर्ल्ड कपआधी टीम इंडियाला तयारीची चांगली संधी मिळणार आहे. मागच्या वर्षी झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने भारताचा दारूण पराभव केला होता, या पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया इच्छूक असेल.