उद्धव ठाकरेंनी बोलावले तर नक्कीच जाऊ…
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
7 July :- उद्धव ठाकरेंनी बोलावले तर आम्ही नक्की जाऊ असे मोठे विधान शिंदे गटातील बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी केले आहे. राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयातील कार्यालयात प्रवेश केला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पूजेसाठी दीपक केसरकर यांनी देखील हजेरी लावली. आजुबाजूच्या काही लोकांना उद्धव ठाकरेंनी दूर ठेवावे असा सल्लाही केसरकरांनी दिला.
उद्धव ठाकरे यांनी जर तुम्हाला परत बोलावले तर तुमची भूमिका काय असेल? असे पत्रकारांनी केसरकरांना विचारले असता ते म्हणाले की, “आम्ही आता भाजपासोबत सत्तेत आलो असून एक नवीन कुटुंब तयार झाले आहे. आता या कुटुंबामधून परत जायचे असेल तर आम्ही एकटे नाही. आम्हाला बोलावताना त्यांना भाजपाशीदेखील चर्चा करावी लागेल.”
पुढे केसरकर म्हणाले की, “अनेक लोक असे आहेत जे आम्ही कामे घेऊन जायचो तेव्हा आमच्याकडे ही कामे द्या, आम्ही उद्धव ठाकरेंना सांगतो असे म्हणायचे. त्यासाठी आम्ही आमदार झालेलो नाही. आमचे मुख्यमंत्री आमचे प्रतिनिधी असतात. त्यांच्या हातात अर्ज दिल्यानंतर आम्हालाही योग्य व्यक्तीच्या हातात सोपवल्याचे समाधान मिळते. कोणीतरी एजंटमध्ये येऊन आमच्याकडे द्या सांगत असेल तर त्याला अधिकार नाही, तो फक्त मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे.”