महाराष्ट्र

आमदार शहाजीबापू खोलीत असताना छप्पर कोसळले…

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

7 July :- ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील OKमधी हाय सगळं’ असे म्हणणारे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील थोडक्यात बचावले आहेत. शहाजीबापू पाटील यांच्या मुंबईतल्या आमदार निवासातील खोलीचे छप्पर खाली कोसळल्याने अपघात झाला. जेव्हा ही घटना घडली. तेव्हा शहाजीबापू खोलीमध्येच होते, अशी माहिती आहे. पण, सुदैवाने त्यांना दुखापत झाली नसून ते सुखरुप आहेत.

दक्षिण मुंबईत मंत्रालयाजवळच्या आकाशवाणी आमदार निवासात शहाजीबापू पाटील यांची खोली आहे. बुधवारी आमदार निवासात आल्यानंतर ते आपल्या खोलीकडे विश्रांतीसाठी गेले. तेव्हा दरवाजा उघडून खोलीत प्रवेश करताच छताचा काही भाग खाली कोसळला. सुदैवाने ते या घटनेतून थोडक्यात वाचले. या घटनेचे काही फोटो समोर आले आहेत. यात महत्त्वाचे म्हणजे छताचा काही भाग हा शहाजीबापू यांच्या बेडवरच कोसळ्याचे फोटोतून दिसून येत आहे.

शहाजी पाटील हे सांगोला मतदारसंघाचे आमदार आहेत. विद्यार्थी दशेपासून ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते. 1985 मध्ये त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे नेते गणपतराव देशमुख यांच्याविरोधात निवडणूक लढवली. मात्र, पाटलांचा पराभव झाला. पुढच्या विधानसभा निवडणुकीतही ते पराभूत झाले. 1995 मध्ये शहाजी हे अवघ्या 192 मतांनी निवडून आले. गणपतराव देशमुख यांचा त्यांनी पराभव केला. मात्र, 1995 सालचा एक विजय सोडला तर शहाजी पाटील यांना सलग पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर झालेल्या चार विधानसभा निवडणुकांमध्ये पाटलांचा पराभव झाला. 2019 मध्ये पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळाले. चार पराभव पाहिल्यानंतर पाटील विजयी झाले. गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत यांचा पराभव अवघ्या 768 मतांनी पराभव करत पाटील विधानसभेत पोहोचले आहेत.