महाराष्ट्र

प. महाराष्ट्राचे पाणी मराठवाड्यात नेणार- उपमुख्यमंत्री फडणवीस

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

7 July :- कोल्हापूर, सांगलीमधील पूराचे पाणी कॅनलच्या माध्यमातून मराठवाड्यात नेले जाणार आहे. 2019 मध्ये सांगली, कोल्हापूरमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा आपण जागतिक बँकेकडून एका प्रोजेक्टला मान्यता दिली होती. त्यात वळण-बंधारे आणि कॅनल सिस्टीमच्या माध्यमातून पाणी मराठवाड्याकडे वळवता येईल का? यावर अभ्यास करण्यात आला होता.

आजच्या बैठकीत आम्ही यावर पुन्हा चर्चा केली असून, जागतिक बँकेने मदत करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यात सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली त्यानंतर फडणवीस माध्यमांशी बोलत होते.

फडणवीस म्हणाले की, 2019 साली स्मार्ट प्रोजेक्ट मंजूर करण्यात आला होता. त्यामध्ये महाराष्ट्रासाठी दहा हजार अॅग्री बिझनेस सोसायट्या तयार करून 19 लाख शेतकऱ्यांना मदत करण्याच्या संदर्भात जागतिक बँकेने देखील 3000 कोटी दिले होते. मात्र, दुर्दैवाने गेल्या अडीच वर्षांमध्ये केवळ 15 कोटी रुपयेच खर्च झाले. त्या प्रोजेक्टचे नाव सध्या बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने असून, या प्रोजेक्टला आता पुन्हा गती मिळण्याकरीता आज बैठक झाली. याचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यात वेगवेगळ्या विभागाने किती अॅग्री बिझनेस संधी निर्माण करायच्या यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.

या बैठकीत जागतिक बँकेचे अधिकारी देखील उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, आम्ही कुठल्याही परिस्थितीत पैसे कमी पडू देणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी निर्देश दिले असून यापुढे वेगाने याची कारवाई झाली पाहिजे अशा सूचना देखील दिल्या आहेत.

पुढे फडणवीस म्हणाले की, या व्यतिरिक्त जागतिक बँकेसोबत आणखी एक बैठक झाली असून, त्यात कोल्हापूर, सांगलीमध्ये आलेल्या पूरावर अभ्यास करण्यात आला होता. भविष्यात पुढे पूर आले तर काय उपाययोजना करायच्या यावर चर्चा करण्यात आली. जागतिक बँकेकडून आपण एक प्रोजेक्टसाठी मान्यता घेतली होती. त्यात वळण बंधारे आणि कॅनल सिस्टीमच्या माध्यमातून पाणी मराठवाड्याकडे वळवता येईल का यावर अभ्यास करण्यात आला होता. आजच्या बैठकीत आम्ही यावर पुन्हा चर्चा केली असून, जागतिक बँकेने मदत करण्याचे निर्देश दिले आहे.

समुद्रातून वाहून जाणारे पाणी गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये नेण्याच्या संदर्भात मागच्या काळात आपण प्रयत्न केले होते. त्यावर देखील आजच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. यासोबतच वैनगंगा, नळगंगा प्रकल्पामुळे आत्महत्याग्रस्त विदर्भ जिल्ह्यात कॅनलच्या माध्यमातून 400-450 किलोमीटरपर्यंत पाणी आणून सहा जिल्ह्यांना त्याचा फायदा द्यायचा असा तो प्रकल्प होता त्याचा देखील आज आढावा घेण्यात आला आहे. मला जुन्या सरकारला दोष द्यायचा नाही. आता एकनाथ शिंदे आणि मी मिळून जुने प्रकल्प गतीने पुढे नेणार आहे, असेही फडणवीस म्हणाले.