शिवसेनेला मोठे भगदाड; तब्बल 66 माजी नगरसेवक शिंदे गटात
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
7 July :- मुंबईत शिवसेनेला धक्के बसत असतानाच ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी शिवसेना जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता ठाण्यातील शिवसेनेचे 66 नगरसेवक शिंदे गटात सामील होत आहेत. म्हस्के यांच्यासह 66 नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेट घेतली. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का आहे.
नरेश म्हस्के हे ठाण्यातील माजी महापौर असून शिवसेनेचे आक्रमक नेते आहेत. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदाचा त्यांनी राजीनामा दिल्याने ठाण्यातील सेनेचे बळ कमी झाले आहे. ते आता शिंदे गटात सहभागी झाले असून शिवसेनेचे ठाण्यातील एकूण 67 नगरसेवकांपैकी 66 नगरसेवक शिंदे गटात गेले आहेत.
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईत शिवसेनेत खिंडार पडण्यास सुरवात झाली आहे. नाराज शिवसैनिक, शाखाप्रमुखांना कसे थांबविणार, असा प्रश्न सध्या उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. अशातच आता शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच हादरे बसू लागले आहेत. काल (बुधवारी) मागाठाणे विभागातील दोन शाखाप्रमुखांनी पक्षाच्या पदांचा राजीनामा दिला आहे.
सेनेचे प्रकाश पुजारी यांनीही शिवसेना विभागप्रमुख विलास पोतनीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या राजकीय घडामोडी आणि ठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्याशी असलेले माझे घनिष्ठ संबंध पाहता प्रभागातील पदाधिकारी व शिवसैनिक माझ्याकडे नाहक संशयाने पाहत परस्परात संभ्रमाचे वातावरण तयार करून माझ्याबाबतीत चुकीचे संदेश पोहचवत आहे. मी याकारणाने माझ्या शाखा प्रमुख पदाचा राजीनामा आपणाकडे सुपुर्त करीत आहे.”
शिवसेना शाखा क्रमांक 3 चे शाखाप्रमुख प्रकाश पुजारी यांचा राजीनामा पक्षाला मोठा धक्का आहे, हे विशेष. कारण आमदारांची बंडखोरी होऊनही आतापर्यंत एकाही शाखाप्रमुखाने उघडपणे राजीनामा दिला न होता. शिवसेना शाखा क्रमांक 12 चे शाखाप्रमुख कौस्तुभ महामुणकर यांनीही राजीनामा दिला आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईत पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे स्वत: शिवसेना भवनात सातत्याने बसून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत असून संघटनेत फूट पडू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असताना शाखाप्रमुखांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे.