महाराष्ट्र

गुलाबराव पाटलांचा मोठा दावा; “१८ पैकी १२ खासदार व २२ माजी आमदार…

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

6 July :- शिवसेनेचे बंडखोर नेते गुलाबराव पाटील यांनी १८ खासदारांपैकी १२ खासदार आणि २२ माजी आमदार आमच्यासोबत येणार असल्याचा मोठा दावा केला आहे. यावेळी त्यांनी विद्यमान ५५ आमदारांपैकी ४० आमदार आमच्यासोबत असल्याचंही नमूद केलं. तसेच आता शिवसेना पक्ष आमचा आहे म्हणत तो पुन्हा उभा करू, असं म्हटलं. ते मुंबईहून जळगावला परतल्यानंतर माध्यमांशी बोलत होते.

गुलाबराव पाटील म्हणाले, “५५ पैकी ४० आमदार आमच्याकडे आहेत. १८ पैकी १२ खासदार आमच्याकडे येत आहेत. आता पार्टी कुणाची, तर आमची. ४ खासदारांना तर मी स्वतः भेटलो आहे. आमच्यासोबत २२ माजी आमदार देखील येणार आहेत. आमचा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना आहे. आम्ही हा पक्ष उभा करू. ते वैभव परत प्राप्त करू. आम्ही ‘तमाम हिंदू बंधू, भगिणी आणि मातांनो’ हे बाळासाहेब शब्द पुन्हा महाराष्ट्रात घमवू. त्यासाठीच आम्ही बाहेर पडलो आहे.”

“ज्यांचा गैरसमज झाला होता त्या कार्यकर्त्यांनी आरोप करणं साहजिक आहे. आमची बाजू त्यांना माहिती होत नाही, तोपर्यंत ते आरोप करतील हे आम्हालाही माहिती होतं. मात्र, बाजू मांडल्यानंतर जळगावमधील वातावरण पहिल्यापेक्षा शांत झालं आहे. मला वाटतं आम्ही सत्तेसाठी बाहेर पडलेलो नाही. सत्ता सोडून बाहेर पडलो,” असं मत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं.

“लोकं सरपंचपदाची खुर्ची सोडत नाही. आम्ही मंत्रीपदं सोडून बाहेर निघालो. १ नाही तर ८ मंत्री बाहेर पडले. याचा अर्थ आम्हाला आमचा शिवसेना पक्ष वाचवायचा आहे. शिवसेना पक्ष संपणार अशी आम्हाला भीती वाटत होती. तो शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी आम्ही सर्वांनी हा उठाव केला आहे,” असंही गुलाबराव पाटील यांनी नमूद केलं.