14 जणांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
5 July :- भाजप-शिंदेसेना सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी पक्षादेश (व्हीप) मोडून विरोधी बाजूने मतदान केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे वगळता शिवसेनेच्या १४ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अशी याचिका शिंदे गटाचे शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांनी सोमवारी अध्यक्षांकडे केली आहे. यामध्ये अजय चौधरी, सुनील प्रभू, डॉ. राहुल पाटील यांच्यासह इतरांचा समावेश आहे.
काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गटनेते म्हणून अजय चौधरी आणि मुख्य प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची नियुक्ती केली. मात्र, एकनाथ शिंदे गटाने मुख्य प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती केली. रविवारी (३ जुलै) गोगावले यांनी अध्यक्षांना पत्र दिले होते. त्यानुसार विधिमंडळ सचिवालयाने पत्र काढून अजय चौधरी यांना गटनेते तर सुनील प्रभू यांना मुख्य प्रतोदपदावरून हटवले. त्यानंतर सोमवारी याविरोधात सेनेकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली. मात्र, कोर्टाने आता सर्व सुनावणी ११ जुलै रोजीच होईल, असे सांगितले. त्यामुळे सेनेच्या गोटात निराशा पसरली.
सोमवारी गोगावलेंनी १६ आमदारांवर कारवाईची मागणी केली आहे. अध्यक्ष आता आदित्य ठाकरेंसह संबंधित आमदारांना नोटीस बजावतील. त्यानंतर व्हीप झुगारणाऱ्या आमदारांचे अध्यक्ष म्हणणे ऐकून घेतील. व्हीप मोडल्याचे अध्यक्षांना वाटल्यास ते पुढे आमदारांवर कारवाई करण्याची शक्यता आहे.
१.प्रणिती शिंदे २. अशोक चव्हाण ३. विजय वडेट्टीवार ४. धीरज देशमुख ५. कुणाल पाटील ६. राजू आवळे ७. मोहन हंबर्डे ८. शिरीष चौधरी ९.जितेश अंतापूरकर १० झिशान सिद्दिकी ११. माधवराव जवळगावकर हे काँग्रेसचे ११ आमदार गैरहजर होते. यातील प्रणिती शिंदे या परदेशात असून जितेश अंतापूरकर यांचे लग्न असल्याने त्यांनी गैरहजर राहण्याची परवानगी मागितली होती.
बविआ ३, प्रहार २, मनसे १, शेकाप १, राष्ट्रीय समाज पक्ष १, जनसुराज्य १ आणि १० अपक्ष हे आमदार सरकारच्या मागे उभे राहिले. माकप १, शेतकरी क्रांतिकारी पक्ष १ आणि देवेंद्र भुयार व संजय शिंदे यांनी विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मतदान केले. भाजपच्या मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप हे गैरहजर होते. अनेक आमदार ११ वाजेपर्यंत सभागृहात पोहोचले नाहीत. शिरगणती होईपर्यंत सभागृहाचे दरवाजे बंद करतात.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी रविवारी (३ जुलै) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधी बाजूने मतदान केले होते. रविवारपर्यंत बांगर हे आपण अखेरपर्यंत उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नसल्याचे सांगत होते. हिंगोलीत रॅली काढत त्यांनी कार्यकर्त्यांना रडत भावनिक आवाहनही केले होते. सोमवारी ते एकनाथ शिंदेंसह सभागृहात पोहोचल्याने त्यांची आता संख्या ४० झालीय.